२० जून १९२२ रोजी हैद्राबाद संस्थानाचे प्रथम हिंदू जज्ज या स्थानी रावसाहेबांची नेमणूक झाली. हिंदू आणि मराठी जनतेच्या स्वाभिमानासाठी आणि हिंदू जनतेला सरकार दरबारी न्याय मिळावा यासाठी न्याय संस्थेतले हे सर्वोच्च स्थान रावसाहेबांनी स्वीकारले होते. न्यायदानाचे हे पवित्र काम रावसाहेबांनी मनःपूर्वक केले. त्या स्थानाला साजेशी अशी वर्तणूक त्यांनी या काळात ठेवली. न्यायालयाचे शिष्टाचार सांभाळून रावसाहेबांनी सामाजिक कार्यक्रमातही भाग घेतला. 

रावसाहेबांची ऍडिशनल जज्ज म्हणून प्रथम दोन वर्षासाठी निवड झाली होती. दोन वर्षानंतर त्यांना अजून एका वर्षासाठी वाढ मिळाली. एखाद्या जज्जाची नेमणूक सहसा पाच वर्षासाठी केली जाते. त्या नियमाप्रमाणे नेमणुकीतील वाढ अजून तीन वर्षासाठी असावी हा आग्रह रावसाहेबांनी धरला. अथवा न्यायमूर्तींच्या खुर्चीवरून उतरण्याची तयारी त्यांनी दाखवली. न्यायदानाच्या घेतलेल्या कामाला रास्त न्याय द्यावयाचा असेल तर हेच योग्य आहे असे त्यांनी निक्षून सांगितलं. अथवा समाज त्यांची त्यांच्या समाजकार्यासाठी वाटच बघत होता. 

अखेर सरकारने त्यांची बाजू मान्य केली आणि तीन वर्षाची मुदतवाढ दिली. न्यायदानाची सेवा रावसाहेबांनी पुढील तीन वर्ष मन:पूर्वक केली. अखेर ३० जून १९२७ साली रावसाहेबांनी नायमूर्तीपदावरून निवृत्ती घेतली. 

वृत्तांत  

२८ जून १९२७ रोजी ‘निजाम विजय’ मध्ये अग्रलेख छापून आला, 

“न्यायमूर्ती केशवरावजी यांच्या नोकरीची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे.  सरकारी वरिष्ठ नोकरीच्या सुवर्णशृंखलांनी न्यायमूर्ती गेली पाच वर्षे जखडले गेले होते आणि  सार्वजनिक कार्यक्रमापासून ते परावृत्त झाले होते. 

सरकारी नोकरीमुळे मनावर जे दडपण पडावयाचे ते न्यायमूर्ती केशवरावांच्या मनावरही पडले असेल. तरीपण सार्वजनिक कामात पडण्याचे एकदा व्यसन जडले, म्हणजे अनेक अडचणी येत असूनही ती कामे सर्वस्वी अंगाबाहेर काढणे होत नाही. न्यायमूर्ती होण्यापूर्वी कित्येक वर्षापासून केशवराव येथील सार्वजनिक संस्थांचे उत्पादक व संस्थापक आहेत. न्यायमूर्ती झाल्यावरही वरील संस्थाना त्यांचा सल्ला आणि आशीर्वाद लाभत होता. इतकेच नव्हे तर हैद्राबाद येथे त्यांच्या मुदतीत ज्या ज्या सनदशीर चळवळी, सभा व परिषदा झाल्या त्या सर्वांस न्यायमूर्ती हजर राहात होते. मग राजकीय सामाजिक शैक्षणिक अगर इतर कोणत्याही विषयांमध्ये असो. उपस्थित राहून न्यायमूर्ती आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा व अनुभवाचा फायदा देण्यास चुकत नसत.  हा न्यायमूर्ती केशवरावजींचा विशेष स्वभाव गुण मानला पाहिजे. 

न्यायमूर्ती केशवराव अधिष्ठित झाले त्यावेळी हायकोर्टात बरीच कामे तुंबून राहिली होती. त्यांनी जाताच ती  भराभर निकालात काढली. त्यांच्या कारकिर्दीत खटल्यांची योग्य चौकशी होऊनही कामे जल्दीने उरकत असत. त्या मुळे त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दी पेक्षाही त्यांची न्याय खात्यातील कारकीर्द लोक आणि  सरकार याना अतिशय प्रिय झाली. न्याय खात्यात स्वतःची कामे संपवून दुसऱ्याना मदत करण्यासही ते नेहमी तत्पर असत.  वृद्धपणीही तरुणास लाजविणाऱ्या उत्साहाने काम करण्याची त्यांची नित्याची शैली ज्यांना ठाऊक आहे त्यांना वरील विधानावर विश्वास ठेवण्यास बिलकुल हरकत नाही. 

तरतरीत बुद्धी, निगर्वीपणा व साधा सरळ व शांत स्वभाव हे केशवरावांचे गुण. यामुळे प्रत्येकास विश्वासपात्र करून घेण्याची कला त्यांस चांगली अवगत आहे. ते लहानापासून थोरापर्यंत प्रेमळपणे सर्वांस जरूर व शक्य ती मदत करण्यास तयार असतात.  आणि त्यांच्याकडून तशी मदत घेण्यास इतरांना संकोच वाटत नाही. न्यायमूर्तींचा या स्वभावविशेषांमुळेच सरकारी नोकरीत असूनही त्यांस पूर्वी संपादन केलेली लोकप्रियता या अवधीत देखील तशीच राखता आली. आता ते सरकारी नोकरीच्या पाशातून मुक्त होत असल्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्या वरील गुणांचे तेज अधिकच फाकेल यात तीळमात्र शंका नाही. 

न्यायमूर्तींना न्यायासनी नेमून सरकारने त्यांचा बहुमान केला ही गोष्ट जरी खरी तरी त्यामुळे गेल्या पाच वर्षात सार्वजनिक कार्याची हानी झाली व ती तशी होणार हे भविष्य ते न्यायमूर्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आम्ही केले होते.  परंतु रावसाहेबांनी आखून दिलेल्या मार्गाने ‘निजाम विजय’ आपले कार्य करीत राहील असे आश्वासनही तेव्हा दिले होते.  गेल्या पाच वर्षाच्या सार्वजनिक जीवनाचे सिंहावलोकन करण्याचा हा प्रसंग नव्हे पण न्यायमूर्तींच्या गैरहजेरीत त्यांच्या आशीर्वादाने ‘विजया’ने आपले कार्य अंशतः तरी केल्याचे आढळेल.  

“कामाचे ढीग पडले आहेत. काहीतरी झाले पाहिजे.” अशी ही तळमळ गेल्या पाच वर्षात न्यायमूर्तीस लागून राहिली होती. सार्वजनिक कामात प्रत्यक्ष भाग घेऊन व काहीतरी खरोखरच करण्याची संधी सरकारने त्यांस दिली आहे व तिचा ते योग्य उपयोग केल्याविना राहणार नाहीत अशी आमची खात्री आहे.  न्यायमूर्तींनी गरिबीतही लहानपणापासून कर्म करीत राहिल्याने मोठ्या उच्च पदाचा लाभ कसा झाला हे आपल्या आचरणाने प्रत्ययास आणून दिले आहे. होतकरू तरुणास अशी आमची सूचना आहे की त्यांनीही न्यायमूर्तींची कारकीर्द आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रगती व प्रभावशाली होण्याचा प्रयत्न करावा. 

सरकारी नोकरीत राहून सार्वजनिक कामे करता येतात हे न्यायमूर्तींनी आपल्या उदाहरणाने प्रत्यक्ष दाखविल्यामुळे त्यांची राज्यसेवा ही देखील एक प्रकारे लोकसेवाच होती. परंतु आता ते लोकसेवेस स्वतःस वाहून नेण्यास सर्वस्वी मुक्त झाल्यामुळे ते पुन्हा आमच्यात आल्याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे. त्यांच्या नेतृत्वाचा फायदा तरुण पिढीला बहुकाल लाभावा याकरिता ईश्वराने त्यांना दीर्घायुष्य द्यावे. न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद संस्थानातील आमच्या हिंदू बांधवांचे सार्वजनिक जीवन अधिक कार्यक्षम व सुखद करावे अशी प्रार्थना करून न्यायमूर्ती रावसाहेबांस अभिवादन करून आज वाचकांची रजा घेतो .”

विचारलहरी 

न्यायमूर्ती पदावर रुजू असताना रावसाहेबांनी तरुणांना दिलेला संदेश ‘निजाम विजय’मध्ये छापून आला होता, 

“जीवाजीवात लहानमोठेपणाचा भाव का असावा बरे? मनुष्य मनुष्यालाच तुच्छ लेखतो.  आपल्यामध्ये आपणच नाना तऱ्हेने पडदे उत्पन्न करून फरक करून घेतो.  रस्ते झाडणारा व रस्त्यावरून चार घोड्यांच्या बाग्गीतून  जाणारा, यात  केवढा फरक पडला आहे? रस्ते झाडणार्‍यास ‘मनुष्यत्व’ आहे, मग त्यास ‘मनुष्यत्वाचा’ मान असावयास पाहिजे ना?   पण आपण त्याला या दृष्टीने पाहतो काय? नाही.  तो गलिच्छ राहतो पण त्याच्या गलिच्छतेचा दोष त्याच्या कमनशिबावर नसून बाग्गीत बसून जाणाऱ्याच्या पापावरच जास्त नाही का?  त्याने जर चार पैसे कमी कमावले असते तर गरिबाला ते मिळाले असते व त्याची स्थिती सुधारली असती. 


काही उच्च कल्पना सुशिक्षित म्हणविणाऱ्यांच्या मनात असतात आणि त्यांचा ‘उच्च’पणा त्या  सुशिक्षितालाच आजमावता येतात येतो.  परंतु त्या अत्युत्तम कल्पनांचे बीज जेव्हा सर्वसाधारण लोकांत रुजेल तेंव्हाच देशाचा उत्कर्षकाल जवळ येईल.  आज आपण पडक्या-झडक्या झोपड्यात  आपले लोक पाहतो, त्यांना स्वराज्याची कल्पना कितपत असते?  मुळीच नसते.  हे विचार त्यांच्या कानापर्यंत पोहोचले पाहिजेत.  देशाचे हित चिंतावयाचे असेल,  देशाचे सुदैव जर उगवायचे असेल तर ते आपल्या पडक्या गवती माळ्यातूनच उगवेल.  प्रत्येक माळ्याला,  शेतकऱ्याला,  परटाला,  टांगेवाल्याला,  रस्ते झाडणार्‍याला,  पाणी भरणाऱ्याला, सर्वांना हा देश माझा आहे असे वाटले पाहिजे. पोट भरण्याकरता मी हे अनेक धंदे पत्करले आहेत,  पण एवढ्यानेच माझे जगातले काम संपत नाही ही भावना आली पाहिजे.  याशिवाय अभ्युदयाच्या  गप्पा वायफळ होत.


नुसते स्वतः ज्ञान संपादन करणे हा अप्पलपोटेपणा आहे.  ज्या प्रकाशाने आपले डोळे उघडले गेले त्याच प्रकाशाने आपल्या लोकांचे डोळे उघडावेत. आपण ज्ञानी होऊन समाधीस्थ झालो तर उपयोगात न आणता येणारी अलोट संपत्ती बाळगण्यासारखे होईल.  राष्ट्रातील चेतना कमी झाली म्हणजे एखादी विभूती निर्माण होते.  विभूतीच्या अंगी स्वतः कार्यतत्पर राहून इतरांकरवी कार्य करून घेण्याची आणि स्वबांधवांना स्फूर्ती देण्याची अचाट ताकद असते.  विभूती आपल्या तेजाने दुसरी विभूती उत्पन्न करू शकते. 


एकीकडून मनुष्याला आपल्या उच्च विचारांच्या मार्गाने जाण्याचा मोह होत असतो तर दुसरीकडून त्याला आपला संसार मार्ग सांभाळावा लागतो.  कित्येक तरुण आपल्या विचारओघामध्ये  जाऊन आपला नाश करून घेतात.  जीवित, हे ‘विचार आणि कृती’ या दोहोंच्या उत्कृष्ट मिश्रणानेच सौख्यप्रद होते. आपल्याला अजून पुष्कळ कार्य करावयाचे आहे ही भावना सतत आपल्या डोळ्यापुढे ठेवावी.  मग निराशेचा कितीही अंधार पसरला तरी त्याची भीती राहत नाही.”