महानायकाचं चरित्र त्याच्या मृत्यूने संपत नाही. नायकाने घेतलेल्या ध्यासाच्या पूर्तीनेच त्या अध्यायाचा समारोप होतो. रावसाहेबांनी उभे आयुष्य एक सक्षम पिढी तयार करण्यात वेचले. एक अशी पिढी घडवायची जी एका स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करेल आणि स्वातंत्र्याची जबाबदारी समर्थपणे पेलेल. रावसाहेबांपासून स्फूर्ती घेऊन पुढे सामाजिक आणि राजकीय लढा देणारे अनेक तरुण संस्थानात निर्माण झाले आणि अखेर निजामशाहीची एकतर्फी राजवट संपुष्टात आली. रावसाहेबांच्या पुण्याईने त्यांचे ज्येष्ठ पुत्र विनायकराव विद्यालंकार स्वतः स्वराज्याच्या लढ्यात अग्रेसर होते. काशिनाथ वैद्यांसारखे रावसाहेबांचे अनुयायि लढ्यात एक सक्षम नेता म्हणून पुढे आले.
१९३५ सालापर्यंत राष्ट्रीय काँग्रेस संस्थानाच्या राजकारणापासून दूर राहिली. परंतु १९३५ च्या काँग्रेस अधिवेशनात संस्थानातील जनतेला देखील स्वराज्याच्या चळवळीत सामील करून घेण्याचा ठराव झाला. परंतु ही चळवळ स्थानिक जनतेच्या पुढाकाराने व्हावी यासाठी वेगळी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. यातूनच हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली.
हैद्राबाद स्टेट काँग्रेसच्या बरोबरीने हैद्राबाद आर्य समाज देखील प्रत्यक्ष लढ्यात उतरला. आर्य समाजाच्या लढ्याचे नेतृत्व विनायकरावांकडे होते. १९३७ साली धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी आर्यसमाजाने सत्याग्रह पुकारला. सर्व प्रांतातून आर्यसमाजी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने हैद्राबादकडे येऊ लागले. निजाम सरकारने घाबरून धरपकडीचे धोरण अवलंबले. हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्याने सत्याग्रह थांबेना तेंव्हा सरकारने विनायकरावांना चर्चेसाठी बोलावले. विनायकरावांनी कोणताही सलोखा करण्यास नकार दिला. ब्रिटिश सरकारने देखील निजामावर सत्याग्रह मिटवण्याचा आग्रह धरला. अखेर सरकारला आर्यसमाजाच्या मागण्या बिनशर्त मान्य कराव्या लागल्या.
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटिशांपासून भारत स्वतंत्र झाला. परंतु निजामाने हैद्राबाद संस्थान स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. रझाकारांकरवी हिंदूंवर अत्याचाराची परिसीमा गाठली. ९ ऑगस्ट १९४८ रोजी विनायकरावांनी सरकारला एक निवेदन प्रस्तुत केले,
“रझाकारांनी केलेल्या अत्याचाराचा बंदोबस्त न करता तुम्ही दुनियेच्या डोळ्यात धूळ फेकून अशी घोषणा करता की संस्थानात अशांतता नाही. या परिस्थितीत निमूटपणे सर्व काही बघून मूक बसणे आम्हाला शक्य नाही.”
परिणाम जो व्हायचा तोच झाला. विनायकरावांना अटक झाली. इकडे सरदार पटेल यांच्या पोलीस ऍक्शनला सुरुवात झाली. भारतीय दल हैद्राबाद संस्थानात पुढे सरकू लागले. हैदराबाद काँग्रेस आणि आर्य समाज यांच्या सारख्या संस्थांच्या नेतृत्वाखाली साऱ्या जनतेने भारतीय दलाचे स्वागत केले. दल हैद्राबादजवळ आले आणि निजामाने अखेर शस्त्र खाली ठेवले.
हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले …