१९९६ मध्ये रावसाहेबांनी गुलबर्गा सोडल्यानंतर सामाजिक कार्याची धुरा विठ्ठलराव देऊळगावकरांच्या हाती आली. वकिलीच्या कामातही त्यांना यश आले. विठ्ठलरावांची त्यागबुद्धी, कामाची कळकळ, समाजाबाबतची आपुलकी या गुणांनी त्यांनी लोकांची मने आपल्याकडे आकर्षित केली. 

सहकारी 

विठ्ठलरावांसोबत समविचाराची आणि गुणवान माणसे गोळा होऊ लागली. गिरिराव अण्णा जहागीरदार विठ्ठलरावांच्या सोबतीला  तर होतेच. त्यांच्याशिवाय गुंडेराव हुमणाबादकर, विनायकराव अभ्यंकर, कृष्णराव राळेरासकर इत्यादी समविचारी मित्रमंडळ गोळा झाले. 

रावसाहेब, गिरिराव अण्णा आणि विठ्ठलराव यांनी शिक्षणप्रसाराची स्वप्ने एकत्र पहिली होती. गिरिराव अण्णांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातले यावली गाव. सोलापूर जिल्हा इंग्रज राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होता. गिरिरावांचे यावलीला येणेजाणे  असायचे. त्यांच्याकडून इंग्रज राज्यात होणाऱ्या घडामोडी विठ्ठलरावांना कळायच्या. 

गुंडेराव हुमणाबादकर आणि विनायकराव अभ्यंकर  विठ्ठलरावांचे वर्गमित्र. तिघांनी वकिलीची परीक्षा एकत्र दिली आणि गुलबर्गा येथे एकत्रच वकिली सुरु केली. कृष्णरावजी राळेरासकर सरकारी नोकरीत होते. परंतु नोकरी सांभाळून शिक्षण प्रसाराचे काम करीत. 

याव्यतिरिक्त विठ्ठलरावांचे बंधु पांडुरंगराव तसेच  बाळकृष्णराव वकील, किशनराव पत्की, गोपाळराव बोरजवकर यासारखे समाजप्रेमी गुलबर्ग्यात काम करत होते. 

स्थापना 

काही कामानिमित्त रावसाहेब पुण्याला गेले होते. शिरस्त्याप्रमाणे परतीच्या वाटेवर त्यांनी गुलबर्ग्यास गिरिरावांकडे मुक्काम केला. गिरिरावांनी विठ्ठलरावांना बोलावून घेतले. तीन मित्रांची बैठक सुरु झाली. रावसाहेब म्हणाले,

“विठ्ठलराव, हैद्राबादमध्ये आमच्या कष्टाला फळ येताना दिसत आहे. ‘विवेक वर्धिनी’ नावानं एक शाळा सुरु करण्याचं चाललं आहे. सातवळेकर आणि वामनराव नाईकांनी देखील यात खूप रस घेतला आहे.”

“विठ्ठलराव, गुलबर्ग्यात शाळा सुरु करायचं आपलं स्वप्न देखील पूर्ण करायला पाहिजे. काय करावं म्हणजे काम पुढं जाईल?” 

विठ्ठलराव बोलते झाले,

“रावसाहेब, गुलबर्ग्यात देखील समविचारी लोकांची जमवाजमव झाली आहे. गिरिराव आहेत.  हुमणाबादकर, अभ्यंकर, बोरगावकर अशी अनेक समविचारी मंडळी आहेत. तुम्ही आलाच आहेत तर एक बैठक घेऊ. कामाला गती येईल”

रावसाहेब म्हणाले,

“जरूर. उद्याच साऱ्यांना बोलवा. उगीच वेळ घालवण्यात अर्थ नाही.” 

विठ्ठलरावांनी ताबडतोब जमावाजमवीला सुरुवात केली. गुलबर्ग्यातल्या त्यांच्या समविचारीं स्नेह्यांना बोलावणी पाठवली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी सायंकाळी सारे विठ्ठलरावांच्या घरी जमले. सभेस गावची प्रमुख मंडळी जमली. रावसाहेबांनी आपल्या मुद्देसूद आणि सर्वांना पटेल अशा शब्दांनी शाळा काढण्याची आपली कल्पना सादर केली.  त्यावर आणखी भाषणे होऊन शाळा स्थापन करावी असे ठरले. शाळेचे नाव “नूतन विद्यालय” असावे असे मान्य करण्यात आले. 

कामला सुरुवात झाली. संस्थेच्या घटनेचा एक मसुदा तयार करण्यात आला. प्रथम विश्वस्तांची यादी तयार करण्यात आली. संस्थापक मंडळाची पहिली बैठक १७ जून १९०७ रोजी संपन्न झाली. विठ्ठलराव देऊळगावरांना  अध्यक्षपदी निवडण्यात आले. गिरिराव आण्णा जहागीरदार यांना सचिवपदी नियुक्त करण्यात आले तर गोपाळरावजी वकील खजिनदार झाले. शिक्षणक्रम कृष्णराव राळेरासकरांनी आखला. 

सुरुवातीचे दिवस 

विठ्ठलरावांनी शाळेची धुरा आपल्या हातात घेतली. विठ्ठलरावांनी चांगली चालू असलेली वकिली थांबवून नूतन विद्यालयाला संपूर्ण वेळ द्यायचे ठरवले. शाळा सात आठ विद्यार्थ्यांपासून सुरु झाली असली तरी विठ्ठलरावांचे स्वप्न आणि आराखडा फार मोठा होता. विद्यालयाची जाहिरात वाचून सरकारी नोकरी सोडून अनेक समविचारी शिक्षक म्हणून शाळेत दाखल झाले. 

साठे, हातळवेकर, श्री. लेखक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. इंदोरच्या गोगट्याना मुख्याध्यापक नेमण्यात आले. शाळेत नवीन प्रयोग करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक गोगटे ह्यांनी इतर शिक्षकांसह पुणे, मुंबई येथील अनेक शाळांना, महाविद्यालयांना भेटी दिल्या. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे मार्गदर्शन घेतले. अभ्यासक्रम तयार केला. शाळेत शिकण्यासाठी बीड, उस्मानाबाद, उमरगा, उदगीर, लातूर येथून विद्यार्थी येऊ लागले.

परंतु शाळेच्या कामात अडथळे येऊ लागले. गोगट्यांवर इंदोर संस्थानात देशद्रोहाचा आरोप होता. त्याचे पडसाद हैद्राबाद संस्थानात देखील उमटले. गोगट्यांना गुलबर्गा सोडून जावे लागले. हैद्राबाद संस्थानचे लक्ष नूतन विद्यालयाकडे देखील गेले. शाळेत राजकीय हालचाली होतात की काय याचा पडताळा घेण्यासाठी अनेक अधिकारी शाळेला भेट देऊन गेले. विठ्ठलरावांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. रावसाहेबांनी देखील या विषयात आपले वजन सरकार दरबारी खर्च केले. अखेर या विषयावर पडदा पडला आणि देशमुख यांची नवीन हेडमास्तरपदी नेमणूक झाली. 

विठ्ठलरावांचा मृत्यू 

परंतु नियतीत काही वेगळेच लिहिले होते. नूतन विद्यालय सुरु होऊन जेमतेम सहा वर्षे झाली आणि विठ्ठलरावांचा वयाच्या ४८ वर्षी अकाली मृत्यू झाला. १९१४ च्या सुमारास त्यांच्या पाठीवर एक बारीकसा फोड आला.  छोटेमोठे उपचार करण्यात आले. पण त्यांना ते दाद देईना.  शरीराची आग वाढत गेली. डॉक्टरांनी हा राजफोड आहे असे सांगितले.  त्यावर गुलबर्ग्यात उपचार होणे शक्य दिसले नाही. पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला नेण्यात आले. परंतु उपचारांना तेथेही यश आले नाही. १३ जानेवारी १९१४ रोजी विठ्ठलराव देऊळगावकरांना देवाज्ञा झाली. 

रावसाहेबांना बातमी कळताच रावसाहेब देऊळगावकर कुटुंबियांच्या सांत्वनाला गुलबर्ग्याला गेले.