२० डिसेंबर, १९२१. रावसाहेब सकाळची नित्यकामे उरकून दिवाणखान्यात बसले होते. दाराचा आवाज झाला आणि रावसाहेबांनी दरवाज्याकडे पहिले. दरवाज्यात ‘निजाम विजय’चे संपादक श्री लक्ष्मणराव फाटक उभे होते. 

लक्ष्मणरावांना दरवाज्यात बघून रावसाहेबांच्या चेहेऱ्यावर स्मित झळकले. आनंदाने केशवराव उद्गारले,

“या लक्ष्मणराव, या, आत या. बसा.”

रावसाहेबांनी नोकराला हाक मारून पाण्याचे तांब्या-भांडं मागवले. लक्ष्मणरावांकडे पाहात म्हणाले,

“काय म्हणता लक्ष्मणराव, सारं कुशल?” “आज सकाळीच काय काम काढलंत?”

लक्ष्मणरावांनी हातातला अंक रावसाहेबांपुढे केला आणि म्हणाले,

“रावसाहेब, आज ‘निजाम विजय’ सुरू होऊन एक वर्ष झालं. दुसऱ्या वर्षाचा हा पहिला अंक."

रावसाहेबांनी अंक घेतला आणि अग्रलेखाचं पान उघडलं. लक्ष्मणरावांनी अग्रलेखाची सुरुवातच अशी केली होती,

“ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो,  जो दिवस प्राप्त व्हावा म्हणून आमच्या हितचिंतकांनी  ‘विजया’ला आशीर्वाद दिले होते, तो दिवस शेवटी उगवला आणि दुसऱ्या वर्षाचा हा पहिला अंक आज वाचकांच्या हाती पडत आहे ही अत्यंत समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. … “

पुढे वाचण्याआधी रावसाहेब आनंदाने म्हणाले,

"अभिनंदन, लक्ष्मणराव. तुमच्या चिकाटीची दाद देतो. सरकारचा रोष सांभाळून देखील तुम्ही नेटानं हे वर्तमानपत्र चालवत आहात."

लक्ष्मणराव समाधानाने म्हणाले,

“धन्यवाद, रावसाहेब. परंतु इथपर्यंत पोहोचण्यात अनंत अडचणी आल्या हे आपल्याला चांगलेच माहित आहे. पदरचा निधी लावून इथपर्यंत पोहोचलो आहोत. आपण आणि वामनराव नाईकांनी उत्तेजन दिले नसते आणि हातभार लावला नसता तर आजचा हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता.”

लक्ष्मणराव फाटक 

श्री लक्ष्मणराव फाटक मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातले. घरची गरीबी. त्यामुळे शिक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नव्हता. लक्ष्मणचे चुलते वारंगल या निजाम राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी ‘स्टेशन मास्तर’ होते. लक्ष्मणच्या वडिलांनी लक्ष्मणला  चुलत्यांच्याकडे शिक्षणास वारंगलला पाठविले. येथेच लक्ष्मणचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.  पुढे काकांनी पेन्शन घेतली आणि हैद्राबाद येथे येऊन स्थायिक झाले.  लक्ष्मणरावांनी हैद्राबाद मध्ये काकांच्या मदतीने छपाईची छोटी-मोठी कामे घेणे सुरू केले. यातूनच लक्ष्मणरावांना स्वतःचे मासिक संपादित करावे अशी कल्पना डोक्यात आली आणि त्यांनी ‘बोध’ या नावाच्या मासिकाची  सुरुवात केली. 

रावसाहेबांचे सहकारी, राघवेंद्रराव  शर्मा वकील हे लक्ष्मणरावांचे चांगले मित्र. लक्ष्मणरावांनी 'बोध'चा पहिला अंक काढला तेंव्हा राघवेंद्रराव लक्ष्मणरावांना रावसाहेबांकडे घेऊन आले. ‘बोध’ मासिक पाहून रावसाहेब प्रभावित झाले. त्यांनी ‘बोध’ची पहिली प्रत विकत तर घेतलीच, परंतु आपल्या पक्षकारांना आणि वकील मित्रांना देखील अंक देण्याची ग्वाही दिली. रावसाहेब  म्हणाले,

“लक्ष्मणराव, हे तुमचे काम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. परंतु तुम्हाला माहीतच आहे, केसरीला संस्थानात बंदी आहे. त्यामुळे हैद्राबादच्या मराठी जनतेसाठी मराठी वर्तमानपत्रच उपलब्ध नाही. तेंव्हा तुम्ही एखादं मराठी वर्तमानपत्र सुरु करण्याचा विचार करावा. आमच्याकडून जी काही मदत लागेल ती आम्ही करू. आम्ही वामनराव नाईकांशी देखील बोलू. ते सुद्धा तुमच्या प्रयत्नांना मदत करतील.”

निजाम विजयची सुरुवात 

रावसाहेबांच्या प्रोत्साहनाने लक्ष्मणराव भारावून गेले. त्यांनी मराठी वर्तमानपत्र काढण्याचं ठरवून टाकले. त्याकाळी वर्तमानपत्र सुरु करण्यासाठी सरकारी परवाना लागत असे. लक्ष्मणरावांनी सरकारी कार्यालयात अर्ज भरला. नवीन मराठी वर्तमानपत्र सुरु करण्याबाबत. वर्तमानपत्राचं नाव होतं , ‘निजाम विजय’

सरकारने प्रथमतः परवानगी क्षुल्लक कारणाकरता नाकारली. परंतु पुढे रावसाहेब आणि वामनराव नाईकांच्या सरकार दरबारी शिफारसीनंतर १९२० मध्ये अखेर परवानगी दिली. ‘निजाम विजय’चा पहिला अंक १९२० च्या डिसेंबर महिन्यात छापून आला. सरकारी तपासणीस खरी उतरेल अशा भाषेत परंतु लोकांना लिखाणाचा योग्य मतितार्थ समजेल अशा लेखनशैलीतून निजाम विजयचे अंक निघत. लक्ष्मणराव आणि त्यांचे सहकारी श्री दिगंबरराव बिंदू या तारेवरच्या कसरतीत खरे उतरले आणि निजाम विजयची मराठी जनतेत लोकप्रियता वाढू लागली. निजाम विजय सर्व वृत्तांत अतिशय निःपक्षपाती पद्धतीने छापीत आणि कोण्या एका पुढाऱ्यातर्फे किंवा पक्षातर्फे लिहिण्याचे कटाक्षाने टाळत.

त्याकाळी केसरीला हैद्राबाद राज्यात बंदी होती. त्यामुळे राज्यातल्या मराठी माणसाची भिस्त निजाम विजयवरच असे. कित्येकवेळा लक्ष्मणराव केसरी मधल्या बातम्या आणि अग्रलेख मोठ्या खुबीने शब्दात फेरफार करून निजाम विजय मध्ये छापत. वाचकाला काय ते कळत असे, आणि सरकारचा रोष सांभाळत असत. 

रावसाहेबांचा निजाम विजयला कायम पाठिंबा असे. कित्येकवेळा निजाम विजयच्या अंकात ते लेखही लिहीत. रावसाहेबांची निजाम विजयला वरचेवर आर्थिक मदतही असे. रावसाहेब फाटकांना नेहमी म्हणत… ,

“समाजाचा सर्वांगीण शैक्षणिक विकास होण्यासाठी प्रौढ शिक्षण फार महत्वाचे आहे. प्रौढ शिक्षणासाठी वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि  ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत… तुम्ही जे कार्य करत आहात तो व्यवसाय नसून एक महान समाजकार्य आहे. ”