जून १९२७ मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी हाय कोर्टाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाल्यानंतर रावसाहेबांनी स्वतःला परत एकदा समाज कार्यात झोकून दिले. १९२६ साली रावसाहेबांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या  हैदराबाद जनता शिक्षण परिषदेचे ते पहिले अध्यक्ष झाले. ‘विवेक वर्धिनी’, ‘हैद्राबाद सामाजिक परिषद’ या संस्थांच्या कामात रावसाहेब हिरिरीने भाग घेत होते. 

१९२९ मध्ये रावसाहेबांचे विठ्ठलराव आणि रामराव हे दोन्ही चिरंजीव विलायतेत होते. द्वितीय चिरंजीव, विठ्ठलराव वेल्स येथे वकिली शिकत होते तर धाकटे रामराव लंडनमध्ये विमान तंत्रज्ञानाचा अभ्यास करत होते.

मुलांच्या पत्रव्यवहारातून इंग्लंड  मधल्या समाजव्यवस्थेबाबत रावसाहेबांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. इंग्लंडची शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था आणि तेथील राहणी जवळून पाहण्याची इच्छा रावसाहेबांच्या मनात आली. रावसाहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की ती पूर्ण करण्याचा त्यांचा स्वभाव होता. 

महर्षी कर्वे सहप्रवासी 

समाजव्यवस्थेची पाहणी करायची असेल आणि त्यापासून बोध घ्यायचा असेल तर प्रवास एखाद्या विद्वान व्यक्तीसोबत करावा. त्यातून खचितच निष्पन्न चांगले होणार या विचाराने रावसाहेबांनी प्रा. धोंडो केशव  कर्व्यांसोबत बोलणी केली. कर्व्यांना देखील विलायतेतील शिक्षणपद्धतीचा अभ्यास करायचा होता. कर्व्यांनीही होकार दिला आणि दोघांनी १९२९ च्या एप्रिल महिन्यात विलायतेची सफर काढली. रावसाहेब ‘रावळपिंडी’ नामक बोटीने लंडनला येऊन पोहोचले. रावसाहेबांचे धाकटे चिरंजीव रामराव दोघांना नेण्यासाठी बंदरावर आले होते.

प्रवासात प्रो कर्वे यांच्यासोबत एक मजेशीर किस्सा झाला. प्रवासात जहाजावरील एका स्टुअर्टशी कर्वेंची आणि रावसाहेबांची चांगली ओळख झाली. प्रवास संपतेवेळी स्टुअर्टला टिप देण्याची पद्धत असे. कर्व्यांनी खिशातून पाच शिलिंग काढून त्या स्टुअर्टला देऊ केले. स्टुअर्टला कर्व्यांची माहिती  असल्याने त्याने आदराने ती टिप नाकारली. कर्वे मिश्कीलपणे त्याला म्हणाले,

“हे पहा, तुम्ही हे शिलिंग घ्या आणि माझ्या संस्थेला देणगी म्हणून परत मलाच द्या. मी त्याची पावती तुम्हाला देतो.”

स्टुअर्टने ते मान्य केले आणि खरंच कर्वेंनी स्टुअर्टच्या हातात संस्थेची पावती ठेवली. रावसाहेब या कर्व्यांच्या कृत्याने भारावून गेले. रावसाहेब उद्गारले, 

“आपल्या सार्वजनिक संस्थेबद्दल एवढी आस्था असणारे विरळेच.” 

प्रो. कर्व्यांसोबत लंडनमध्ये काही दिवस तेथील संग्रहालये, ग्रंथालये यांची पाहणी केल्यानंतर कर्वे काही शिक्षणसंस्था पाहण्यासाठी लंडनमध्ये थांबले तर रावसाहेव स्वतः मात्र पर्यटनासाठी विठ्ठलरावांकडे गेले. 

वेल्सला प्रयाण 

विठ्ठलराव वेल्समधल्या ऍबर या गावी वकिली शिकत असत. वेल्स हा ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग असला तरी इंग्लंडपासून वेगळा देश होता. वेल्समधली संस्कृती आणि इंग्रजी भाषा इंग्लंडपेक्षा बरीच वेगळी होती. ऍबर हे वेल्स मधील एक अतिशय सुंदर शहर होते. शहर तेथील विद्यापीठासाठी प्रसिद्ध होते. जगभरातून अनेक विध्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येत असत. वेल्सच्या पश्चिमी समुद्रतटावर वसलेलं ऍबर शहर पर्यटकांसाठी एक पर्वणी होती. दक्षिण वेल्स आणि उत्तर वेल्स यांच्या संस्कृतीचा उत्तम मेळ ऍबर शहरात पाहायला मिळतो. 

१७ एप्रिल १९२९ ला रावसाहेब लंडनहून रेल्वेने ऍबरला पोहोचले. विठ्ठलराव रावसाहेबांना घ्यायला रेल्वे स्थानकावर आले होते. विठ्ठलरावांनी आणि रावसाहेबांनी  वेगवेगळ्या संग्रहालय, लायब्ररी इत्यादींना भेटी देऊन स्थानिक संस्कृतीची ओळख करून घेतली. 

विठ्ठलराव यांनी रावसाहेब यांची त्यांच्या घर मालकीणीशी  ओळख करून दिली. तिला रावसाहेबांनी ‘नमस्ते’ करायला शिकवले. त्यापुढे त्या नेहमी ‘नमस्ते’ करून अभिवादन करत. सकाळचा फराळ झाला की पिता-पुत्र समुद्र काठी फेरफटका मारायला जात. शहराची ठेवण आणि स्वच्छता पाहून रावसाहेब म्हणत,

"आपल्याला अजून या लोकांकडून पुष्कळ शिकायचे आहे"

एकदा विठ्ठलराव रावसाहेबांना वेल्स नॅशनल लायब्ररीमध्ये घेऊन गेले. भारतीय पर्यटक आले आहेत म्हणून संग्रहालयातल्या गाईडने रावसाहेबांना एक हिंदुस्तानातील तैलचित्र दाखवले. १५ ते २० फूट लांबीचे ते तैलचित्र राम-रावण युद्धावर होते. गाईडच्या सांगण्याप्रमाणे ते चित्र ७ ते ८ शतके जुने होते. एका वेल्स सैनिकाने भारतातून परत येताना ते आणले आणि लायब्ररीला दान केले. तैलचित्राचे बारकाईने अवलोकन करून रावसाहेब म्हणाले,

“हे चित्र आपण म्हणता तेवढे जुने नसावे. राम-रावण युद्धाचे वेळी सैनिक माकड हॅट घालणार नाहीत आणि त्याकाळी बंदुकी पण नव्हत्या. तेंव्हा इंग्रज हिंदुस्तानात आल्यानंतरचे हे चित्र असावे”

गाईडने रावसाहेबांच्या अवलोकनाला दाद दिली आणि त्याप्रमाणे नोंदणी करून ठेवली. ही अतिशय मोठी लायब्ररी होती आणि कोणताही ग्रंथ ताबडतोब मिळण्याची पद्धत पाहून रावसाहेबांना फार आनंद वाटला. 

विठ्ठलरावांच्या कॉलेजातून फिरत असताना रावसाहेबांना वाटे, आपण पुन्हा शिक्षणास प्रारंभ करावा. विठ्ठलराव यांना तो रावसाहेबांनी  बोलूनही दाखवला,

"येथील अथॉरिटी जर मला परवानगी देतील तर मी येथे वर्षभरात  कायदे विषयी निबंध लिहून देईन. माझ्या आवडीचा विषय असेल, 'खुनी इसमास फाशीची शिक्षा देणे कायद्याच्या दृष्टीने इष्ट आहे काय?’"

रावसाहेबांना विठ्ठलरावांच्या हिंदुस्थानी तरुण मित्रांबरोबर चर्चा  करायला खूप आवडत असे. अनेक तत्कालीन विषयावर ते चर्चा करत. उदाहरणार्थ, ‘हिंदी राष्ट्रभाषा होणे इष्ट किंवा नाही?’, ‘देशाच्या उन्नत्तीत्त सुक्षित तरुण वर्गाचे काय योगदान असू शकते?’, ‘हिंदुस्थानी तरुणांनी विलायतेत येऊन इंग्रज तरुणींशी लग्न करावे का?’, या आणि अशा अनेक विषयांवर ते विठ्ठलरावांच्या मित्रांशी चर्चा करत. 

दोन आठवडे विठ्ठलरावांसोबत राहिल्यानंतर रावसाहेब परतीच्या प्रवासाला निघाले. रावसाहेबांना सोडायला विठ्ठलराव रेल्वे स्टेशनवर आले. स्टेशनवर विठ्ठलरावांनी रावसाहेबांना वाकून नमस्कार केला. रावसाहेबांनी विठ्ठलरावांना छातीशी घेऊन आशीवाद दिला. निरोप घेताना दोघांना माहीत नव्हते की ही पिता-पुत्रांची शेवटची भेट होती…