शिक्षण प्रसारात रावसाहेबांना जेवढा रस होता तेवढीच  तिडीक त्यांना समाज परिवर्तनात होती. समाजातील चुकीच्या चालीरितींचा त्यांना मनस्वी तिटकारा होता. जोपर्यंत समाजात अनिष्ट चालीरिती आहेत तोपर्यंत स्वराज्य भोगण्यास योग्य अशी नवी पिढी निर्माण होणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आर्यसमाजाद्वारे तर रावसाहेबांनी अशा अनिष्ट प्रथांविरुद्ध बंड तर पुकारले होतेच, परंतु समाजात जागरूकता आणण्यासाठी अनेक संस्थांतून ते काम करत होते. त्यापैकी ‘सामाजिक परिषद’, ‘हैद्राबाद स्टेट रिफॉर्म कॉन्फरन्स’ या महत्वाच्या संघटना होत्या. 

पार्श्वभूमी   

साल १९२१. ‘सामाजिक परिषदे’चे चौथे वार्षिक अधिवेशन यंदा हैद्राबादमध्ये भरणार होते. ‘सामाजिक परिषदे’ची स्थापना होऊन तीन वर्षे होऊन गेली होती. पहिली तिन्ही अधिवेशने संस्थानाच्या नांदेड जिल्ह्यात झाली. १९१८ साली सर्वप्रथम सामाजिक परिषदेचं अधिवेशन सदानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्यानंतर दुसरे अधिवेशन रावसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाले आणि १९२० साली तिसरे अधिवेशन वामनराव नाईकांच्या अध्यक्षतेखाली झाले.  

निजाम राज्यातील मराठी जनतेत सामाजिक परिवर्तनाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी ‘हैद्राबाद सामाजिक परिषद’ या संस्थेची स्थापना श्री. केशवराव कोरटकर आणि श्री. वामनराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आली होती. परिषदेचे मूळ उद्देश्य समाजात लोकजागृती निर्माण करून समाजातील अनिष्ट चालीरितींचे निर्मूलन करावे हा होता. सामाजिक परिषदेच्या दृष्टीपथात असणाऱ्या काही सुधारणा अशा होत्या: 

सामाजिक परिषद, चौथे अधिवेशन 

सामाजिक परिषदेचे कार्य समाजात दखलपात्र व्हावे आणि कार्यास वृद्धी मिळावी या हेतूने पुढील अधिवेशन हैद्राबाद येथे घ्यावे असा ठराव तिसऱ्या अधिवेशनात झाला होता. आणि त्यानुसार हैद्राबादच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झाली होती. 

रावसाहेबांचे उत्साही सहकारी, राघवेंद्रराव शर्मा वकील यांनी सामाजिक परिषदेच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी एकत्र बोलावले. राघवेंद्रराव आणि रावसाहेब यांचे घनिष्ट संबंध. सामाजिक जागृतीबाबत दोघांचे विचार मिळत. हैद्राबादमध्ये अनेक सामाजिक संस्थांवर दोघे एकत्र काम करत.

राघवेंद्रराव, रावसाहेब, वामनराव नाईक आणि इतर सहकारी ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाचा आराखडा बनवण्यासाठी बसले. सर्वप्रथम रावसाहेबांना स्वागत समितीचे मुख्य करण्यात आले. रावसाहेबांनी जबाबदारी मान्य करून आपले मनोगत मांडले

"अधिवेशन यशस्वी करायचे असेल तर कोण्या कर्तृत्ववान व्यक्तीला अध्यक्ष निवडणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीचे मार्गदर्शन तर आपल्याला लभेलच परंतु सभेत एक चैतन्य येईल."

रावसाहेब क्षणभर थांबले आणि पुन्हा बोलू लागले,

"माझ्या मनात धोंडोपंत कर्व्यांना अध्यक्ष म्हणून बोलवावे अशी इच्छा आहे. कर्व्यांचं   काम अतुलनीय आहे. आपल्या सामाजिक परिषदेस अध्यक्ष म्हणून कर्वे निश्चितच योग्य आहेत. किंबहुना त्यांच्या येण्यानी आपली सभा उपकृत होईल.”

धोंडो केशव कर्वे अध्यक्ष 

धोंडोपंत केशव कर्वे यांचा जन्म १८५८ साली कोकणात एका गरीब घराण्यात झाला. गरिबीतून आणि बिकट परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी मुंबई विश्वविद्यालयात पदवी मिळवली. त्यानंतर पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये वीस वर्षे गणित विषयाचा अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 

परंतु कॉलेजात काम करीत असतानाच त्यांचे लक्ष स्त्री शिक्षणाच्या कार्याकडे वेधले गेले. स्त्रियांना शिक्षणासाठी पुरेसा वाव नव्हता. त्यात विधवांची तर फारच दुरवस्था होती. स्त्री शिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी प्राध्यापक कर्वे यांनी पुणे येथे १८९५ साली ‘अनाथ बालिकाश्रम’ या नावाने विधवांसाठी एक संस्था स्थापन केली. तसेच १९०७ मध्ये महिला विद्यालय स्थापन केले. साऱ्या देशात आदर्श होऊ शकेल असे  ‘भारत महिला विद्यापीठ’ स्थापन करून त्यांनी  महिला वर्गावर अनंत उपकार करून ठेवले. प्रोफेसर कर्वे हे विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते असल्याने त्यांनी स्वतःच विधवेशी पुनर्विवाह  करून एक अनुकरणीय उदाहरण घालून दिले.  

कर्व्यांच्या नावाला कोणाला आक्षेप घेण्याचे काही कारणच नव्हते. रावसाहेबांचा प्रस्ताव साऱ्यांनी एकमताने  संमत केला. परिषदेच्या तारखा ११ आणि १२ नोव्हेंबर १९२१ अशा ठरवण्यात आल्या.  ‘निजाम विजय’ पत्रकात ११ ऑक्टोबर रोजी त्याप्रमाणे छापूनही आले. परिषदेच्या यशस्वितेसाठी सारे कामाला लागले. 

कर्वेंशी पत्रव्यवहार करण्याचे काम रावसाहेबांवर सोपवण्यात आले. रावसाहेबांची प्राध्यापक कर्वेंशी  स्नेहसंबंध, कर्वे फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राध्यापक असल्यापासून होते. केशवरावांच्या पुण्याच्या दौऱ्यात केशवरावांनी कर्वेंच्या शाळेला आवर्जून भेट दिली होती. कर्वेंनी अध्यक्षपदासाठी येण्याचे आनंदाने मान्य केले. 

ठरल्याप्रमाणे अधिवेशन शुक्रवार तारीख ११ नोव्हेंबर १९२१ रोजी सकाळी आठ वाजता सुरू झाले.   नियोजित अध्यक्ष प्राध्यापक कर्वे गुरुवारी संध्याकाळच्या गाडीने हैद्राबादेस येऊन पोहोचले होते.  परिषदे करता ‘विवेक वर्धिनी’चे थिएटर उत्तम रीतीने शृंगारण्यात आले होते.  परिषदेस २,००० च्या वर जनसमुदाय जमला होता. हैदराबाद संस्थानातील सर्व  जिल्ह्यातून अनेक प्रतिनिधी आले होते. 

परिषदेच्या प्रारंभी स्वागत कमिटीचे अध्यक्ष केशवराव कोरटकर यांनी समायोचित शब्दात पाहुण्यांचे स्वागत केले. प्राध्यापक कर्वे यांच्या सामाजिक कर्तव्याची सर्वांस माहिती सांगून अध्यक्षांच्या निवडणुकीचा ठराव पुढे मांडला.  त्यावर श्री वामनराव नाईक यांनी अनुमोदन दिल्यानंतर निवडणुकीचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला आणि अध्यक्ष टाळ्यांच्या गजरात स्थानापन्न झाले.   

सभेत दोन दिवसात परिषदेच्या उद्दिष्टाबाबत अनेक ठराव पास करण्यात आले.  पुढील वर्षीचे पाचवे अधिवेशन गुलबर्गा येथे भरवण्याचा देखील ठराव पास झाला. प्राध्यापक कर्वे यांनी उपस्थित श्रोत्यांना समाज जागृतीबाबत मार्गदर्शन केले.  कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.