हैद्राबादेस स्थलांतर 

साल १८९६. गीताबाई बाळंतपणानंतर कळंबहून परत येऊन वर्ष होऊन गेले  होते. विनायक आता दीड वर्षाचा झाला होता. छोटा विनायक आता घरात दुडुदुडु  धावायला लागला होता. आपल्या बोबड्या बोलीत काय पाहिजे नको ते सांगायला लागला होता. विनायकच्या मागे दिवसभर धावण्यात  आणि त्याचे खाणेपिणे   करण्यात गीताबाईंचा दिवस कसा जायचा कळत नसे. केशवराव देखील सहसा काम आटोपून विनायकशी खेळायला लवकर घरी येत असत.  हैद्राबादला स्थलांतराचा निर्णय तर नक्की झाला होता. केशवराव हातातली कामे संपवत होते आणि लांब चालणारी नवीन कामें सहसा टाळत होते. अशी बहुतांशी कामें ते गिरिराव अण्णा किंवा विठ्ठलरावांकडे पाठवत असत. 

अखेर तो दिवस उजाडला. केशवराव गीताबाई आणि विनायकला घेऊन आगगाडीने वाडी मार्गाने हैद्राबादला निघाले. स्टेशनवर निरोप द्यायला गिरिराव अण्णा आणि विठ्ठलराव सपत्नीक आले होते. या आधीच केशवरावांनी हैद्राबादमध्ये बिऱ्हाडासाठी  भाड्याच्या जागेची व्यवस्था केली होती. रामाचारी वकिलांचे सहकारी म्हणूनच ते प्रथम वकिली करणार होते. 

हैद्राबादेत पोहोचल्यावर बिऱ्हाडाची व्यवस्था लावण्यात काही दिवस गेले. हैद्राबादेत मराठी भाषिकांची संख्या त्याकाळी बऱ्यापैकी होती परंतु दैनंदिन व्यवहारात देखील थोडीफार उर्दू येणे आवश्यक होते. गीताबाईंना कळंब किंवा गुलबर्ग्यात तसे उर्दूत व्यवहार करण्याची  वेळ फारशी आली नव्हती. त्यांना तर हे सारे नवीन होते. घरचे दैनंदिन व्यवहार मार्गी लागल्यानंतर केशवराव वकिलीच्या कामाला लागले. 

त्याकाळी निजाम राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या गावी  न्यायालय असे. त्याला जिल्हा न्यायालय म्हणत. त्यावरती प्रत्येक सुभ्याच्या गावी सत्र न्यायालय असे. त्याकाळी हैद्राबाद, औरंगाबाद, गुलबर्गा आणि वारंगल याठिकाणी अशी चार सत्र न्यायालये होती. एखाद्या सत्र न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्यास पक्षकाराला हैद्राबाद येथे “अदालत-ए-मुराफा” किंवा अपील कोर्टात खटला दाखल करण्याची मुभा होती. अपील कोर्ट हे निजाम राज्याचे सर्वोच्च कोर्ट असे आणि अपील कोर्टाने दिलेला निर्णय पक्षकारांना मानणे अनिवार्य होते. याच अपील कोर्टाला हायकोर्ट म्हटले जात असे. 

या हैद्राबादच्या अपील कोर्टात केशवरावांनी वकिली सुरु केली. प्रथम रामाचारी वकिलांचे सहकारी म्हणून आणि नंतर स्वतंत्रपणे परंतु रामाचारी वकिलांच्या सल्ल्याने ते वकिली करू लागले. लवकरच केशवरावांनी एक हुशार वकील म्हणून हायकोर्टात ख्याती मिळवली. गुलबर्गा येथील पक्षकार तर त्यांच्याकडे येतच होते, परंतु औरंगाबाद आणि इतर मराठवाड्यातील मराठी पक्षकार देखील केशवरावांकडे आपला खटला देणे पसंत करू लागले. त्यातच रामाचारी वकिलांचा मृत्यू झाला. आता केशवरावांची वकिली कमी होईल असे काही जणांनी भाकीत केले. परंतु झाले उलटे. रामाचारी वकिलांचे पक्षकार केशवरावांकडे तर येऊ लागलेच, परंतु औरंगाबाद, गुलबर्गा, वारंगल आणि हैद्राबादचे हिंदू पक्षकार आता केशवरावांकडेच येणे पसंत करू लागले. 

हायकोर्टात त्याकाळी बहुतांश वकील मुसलमान होते. कोर्टात सर्व खटले उर्दूत चालत असल्याने आणि मुसलमानांची ती मातृभाषा असल्याने मुसलमान वकिलांना खटला लढवणे सोपे जात होते. त्यातून निजाम सरकार मुसलमान धार्जिणे असल्याने बहुतांशी न्यायाधीशही मुसलमान असत. यासर्व प्रकाराने हिंदू समाजाची अतिशय कुचंबणा होत असे. काही हिंदू वकील उत्तर प्रदेशातून येऊन हैद्राबादमध्ये स्थायिक झाले होते. त्यांना उर्दूची जाण होती. परंतु राज्यातील हिंदू मराठी, कानडी किंवा तेलगू भाषिक होते. त्यामुळे यांना या हिंदू वकिलांबरोबर देखील व्यवहार करणे अवघड जाई. अशा परिस्थितीत केशवराव हे एकमेव वकील होते ज्यांना मराठी, कानडी, तेलगू भाषा तर येतच होत्या परंतु उर्दूवरही प्रभुत्व होते. 

केशवरावांची वकिली अनेक पटीने वाढली. केशवराव कोरटकर आता आदराने ‘रावसाहेब’ म्हणून ओळखले जाऊ लागले.