समाजात जागृती निर्माण करून एक सक्षम पिढी निर्माण करणे ही रावसाहेबांची कळकळ असली तरी कोणत्याही संसारी पुरुषाचे प्रथम कर्तव्य सुयोग्य अर्थार्जन करून आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेणे ही आहे हे त्यांचं ठाम मत होतं. तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला बलवान आणि सक्षम केले नाही तर तुम्ही समाजाला आधार देणार तरी कसा?
व्यक्तिमत्व
रावसाहेबांचा स्वभाव अतिशय शांत होता. त्यांना सहसा राग येत नसे आणि आला तर ते तो चेहेऱ्यावर दाखवीत नसत. त्यांचा आपल्या मनावर पूर्ण ताबा होता. कुटुंबीयांनाच काय पण घरातल्या नोकरांशी देखील ते रागावून बोलत नसत. सर्वाना ते अहोजाहो संबोधित. घरी चहा किंवा एखादा पदार्थ त्यांच्या आवडीचा झाला नसला, तरी ते नावे ठेवीत नसत. उलट तो पदार्थ छान झाला आहे असे म्हणून त्याची स्तुती करीत. रावसाहेबांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. जेवण झाल्यावर सुपारी खाण्याची देखील सवय रावसाहेबांना नव्हती. ऐषारामाची रावसाहेबांना तिडीक होती. त्यांचा स्वभाव फार भिडस्त होता. आपल्याला हवं नको तेसुद्धा घरच्यांना ते सांगत नसत.
खेळ म्हणून पत्त्यांची आवड मात्र रावसाहेबांना होती आणि ते पत्ते उत्तम खेळत. हैद्राबाद येथे एखादी मराठी नाटक मंडळी आली म्हणजे बहुधा ते त्यांच्या प्रयोगास जात असत. अर्थात करमणुकीशिवाय कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा त्यामागे हेतू असे.
त्यांचे तिसरे करमणुकीचे साधन म्हणजे प्रवास होय. प्रवास करण्याचा त्यांना फार नाद होता. एक दिवसाची सुट्टी जरी मिळाली तरी त्याचा फायदा घेऊन कुठेतरी प्रवास करून येत.
त्यांना व्याख्यानांची अतिशय आवड होती. आठवड्या पंधरा दिवसात एखादं व्याख्यान झाले नाही तर त्यांना बरे वाटत नसे.
वाचन हा त्यांचा मोठा छंद होता. विशेषतः ऐतिहासिक पुस्तके वाचण्यांवर त्यांचा भर असे. ज्या वाचनामुळे बुद्धीचा विकास होईल अशीच पुस्तके ते वाचत. केव्हाही प्रवासास गेले म्हणजे दोन-तीन पुस्तके आपल्याजवळ ठेवत आणि प्रवासात त्याचे वाचन चाले.
गीताबाई
गीताबाईंनी रावसाहेबांच्या कार्यात मनापासून भाग घेतला. वकिली व्यवसाय आणि समाज कार्यात घरी लोकांचे कायम येणेजाणे असे. बाहेरगावचे सहकारी वकील, घरोब्याचे पक्षकार आणि समाज कार्यातले मित्र अनेकवेळा घरीच उतरत. पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात गीताबाई कसूर सोडत नसत. हाताखाली नोकरांचा राबता असला तरी गीताबाई जातीने साऱ्या कामाची देखरेख करत.
गीताबाई सनातनी विचारांच्या होत्या. याउलट रावसाहेब आर्य समजी होते. मूर्तिपूजा आणि हिंदु धर्मातल्या अनाठायी चालीरितींवर रावसाहेब यांचा विश्वास नव्हता. परंतु रावसाहेबांनी गीताबईंवर आपले विचार थोपले नाहीत. स्वयंपाकघर आणि घरातले देवघर यावर गिताबाईंचा ताबा असे. रावसाहेब यात हस्तक्षेप करत नसत.
एकदा मोठी गंमतीशीर गोष्ट घडली. १९११ च्या सुमारास रावसाहेब पुण्याला गेले होते. त्यावेळेस पुण्यातल्या समाज सुधारकांनी एका हरिजन सहभोजनाची योजना केली होती. रावसाहेब या सहभोजनात मोठ्या अभिमानाने सहभागी झाले. हैद्राबादला परत आल्यावर रावसाहेबांनी सारी घटना गीताबईंना सांगितली. संध्याकाळी जेवणाची वेळ झाली तेंव्हा गिताबईंनी निक्षुन सांगितले,
"तुमचे समाजकार्य आणि विचार यामध्ये आम्ही पडणार नाही. परंतु घरचं स्वयंपाकघर आणि देवघर तुमच्या कार्यापासून दूर ठेवा. आजपासून आपल्या जेवणाची व्यवस्था आम्ही दिवाणखान्यात करत जाऊ."
रावसाहेबांनी यावर कोणताही प्रतिकार केला नाही. विनायकला कांगाडीला पाठवताना रावसाहेब यांनी गीताबाईंना दुखावले होते, त्याची अंशतः परतफेड जणू रावसाहेब करत होते. त्यानंतर अनेक दिवस रावसाहेब यांचे ताट दिवाणखान्यात लागत असे.
ऋणानुबंधांच्या गाठी | दैवाने बांधिल्या ||
अर्पुनिया परस्परांना | प्रेमे निभाविल्या ||
विनायकराव
१९०२ मध्ये विनायकने कंगडी येथील आर्य समाजाच्या गुरुकुलात प्रवेश घेतला. १६ वर्षांनंतर १९१९ साली विनायकराव विद्यालंकार ही गुरुकुलातली उच्च पदवी घेऊन स्वगृही हैद्राबादला परत आले. १६ वर्षे कांगडी येथे राहिल्याने विनायकराव आपली मातृभाषा जवळपास विसरले होते. हिंदी, उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर मात्र विनायकरावांचे कमालीचे प्रभुत्व होते. गीताबाईंशी ते आपल्या तोडक्या मोडक्या मराठीत बोलत तर रावसाहेबांच्या सोबत बहुधा उर्दूत बोलत.
विनायकरावांना वडिलांबद्दल कमालीचा आदर होता. ते आपल्या वडिलांना गुरुस्थानी मानत. विद्यालंकार पदवी मिळाल्यानंतर काय करावे यासाठी त्यांनी रावसाहेबांचा सल्ला विचारला,
"अण्णा, मला आर्य समाजाच्या कामाला वाहून घेण्याची इच्छा आहे. परंतु याबाबत मला आपला सल्ला हवा आहे."
ऐकून रावसाहेब यांना खूप आनंद झाला. विनायक रावांनी आपला समाजकार्याचा कित्ता गिरवावा ही त्यांचीही इच्छा होती. रावसाहेब म्हणाले,
"विनायकराव, तुम्ही समाजासाठी काम करावं ही माझी देखील इच्छा आहे. परंतु त्याआधी विलायतेला जाऊन बॅरिस्टर पदवी घ्यावी असे मला वाटते. विलयतेत तुम्हाला वकिलीशिवय खूप काही शिकायला मिळेल. त्याचबरोबर बॅरिस्टरची सर्वमान्य पदवी घेतल्याने पुढील आयुष्यात अग्रक्रम करणे सोपे होईल."
विनायकरावांनी रावसाहेबांचा सल्ला शिरसावंद्य मानला आणि बॅरिस्टर पदवी मिळवण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले.
विनायकराव इंग्लंडमध्ये असताना बाळ गंगाधर टिळक इंग्लंडमध्ये आले होते. केशवराव यांनी ही बातमी विनायकरावांना कळवली आणि टिळकांची भेट घेण्याची सूचना केली. विनायकरावांनी आपल्या भारतीय सहकाऱ्यांसोबत टिळकांची भेट घेतली. या भेटीचा विनायकरावांवर फार मोठा प्रभाव पडला. ३ वर्षे इंग्लंड मध्ये राहून बॅरिस्टर डिग्री घेऊन १९२३ साली विनायकराव हैद्राबाद येथे परत आले आणि रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली आणि समाजकार्य करू लागले.
इंग्लंडला जाण्याआधीच गीताबाईंनी विनायकरावांकडे लग्नाचा विषय काढला होता. परंतु ‘बॅरिस्टर पदवी मिळाल्यानंतर बघू’ असे सांगून विनायकरावांनी विषय टाळला होता. विनायकराव परत आल्यानंतर मात्र गीताबाईंनी आग्रह धरला. रावसाहेबांनी देखील मनावर घेतले आणि विनायकरावांचे दोनाचे चार हात झाले. वयाच्या २७ व्या वर्षी विनायकरावांचे अनुसुयाबाईंशी थाटामाटाने लग्न झाले.
त्याकाळी हुंडा पद्धत रूढ होती. लग्नात मुलीच्या वडिलांनी वरास संपत्ती भेट देण्याची प्रथा होती. एखादा मुलगा चांगला शिकलेला असेल किंवा त्याला चांगली नोकरी असेल तर हुंडा त्याप्रमाणे वाढत असे. ही प्रथा मुलीच्या वडिलांना जाचक असे. रावसाहेब अशा अनिष्ट पद्धतींच्या विरुद्ध होते. विनायकरावांच्या लग्नात त्यांनी हुंडा घेणे कटाक्षाने टाळले. निजाम विजयच्या अंकात याबाबत मुद्दाम बातमी छापून आली,
“केशवरावजी यांनी सनातन धर्म पद्धतीने चिरंजीव विद्यालंकार विनायकराव यांचा विवाह बारा मे सन १९२३ रोजी मोठ्या थाटाने साजरा केला. लग्न समारंभास राजे, महाराजे, जहागीरदार, शेठ, सावकार, बडे अधिकारी हजर होते. केशवरावांनी हुंडा न स्वीकारता प्रौढ विवाह अमलात आणून लग्न समारंभ थोडक्यात कसा करावा याचा धडा घालून दिला आहे. वधू वर दीर्घायुष्यी होवोत असे आम्ही इच्छितो”
मुलांचे मार्गी लागणे
रावसाहेब यांचे द्वितीय चिरंजीव विठ्ठलराव यांचे प्राथमिक शिक्षण ‘विवेक वर्धिनी’ मध्ये झाले. परंतु पुढील शिक्षणासाठी रावसाहेब यांनी विठ्ठलरावांना पुण्याला पाठवले. विठ्ठलरावांनी न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक पास केल्यानंतर पुण्यातच फर्ग्युसन कॉलेज मधून पदवी घेतली आणि पुढे जाऊन विलायतेत वकिलीची पदवी घेतली. विठ्ठलराव स्वतः कवी होत आणि काही काळ पुण्याच्या ‘रविकिरण मंडळा’चे सभासद होते.
तिसरे रामराव देखील शिक्षणासाठी पुण्यात राहिले आणि विमान तंत्रज्ञानात देशातील पहिले पदवीधर झाले. सगळ्यात धाकट्या गंगूताईंचा विवाह रावसाहेबांचे परम मित्र राघवेंद्रराव यांचे कनिष्ठ बंधू श्रीनिवासराव शर्मा यांच्याशी झाला. श्रीनिवासराव पेशाने वकील होते आणि रावसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद हायकोर्टात वकिली करत होते.