सहकारी
साल २००७. रावसाहेबांना हैद्राबादला येऊन १० वर्ष होऊन गेली होती. वकिलीत रावसाहेबांचा जम तर चांगला बसला होताच, परंतु सामाजिक विकासाच्या कामात त्यांचा परिचय अनेक समविचारी सहकाऱ्यांसोबत झाला होता. यात सर्वात महत्वाच्या सहकाऱ्यात श्री वामनराव रामचंद्र नाईक आणि पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे अग्रस्थानी होते.
श्री वामनराव रामचंद्र नाईक यांचा जन्म १८७८ साली तेलंगणात वनपर्ती येथे एका सधन जहागीरदार कुटुंबात झाला. नाईक कुटुंब हे तेलंगणातील. परंतु त्यांची मातृभाषा मराठी होती. वामनरावांना नाईक घराण्याचा समाजसेवेचा वारसा मिळाला होता. वामनरावांच्या जन्माच्या वेळी वनपर्ती येथे मोठा दुष्काळ पडला होता. खर्चाची पर्वा न करता नाईक कुटुंब गरिबांच्या रक्षणासाठी धावून गेले होते. वामनरावांचे वडील रामचंद्रराव सावकारीचा व्यवसाय करत. परंतु गरिबांच्या अडीअडचणीला त्यांची फार मोठी मदत असे. वनपर्ती भागात रामचंद्ररावांना आणि नाईक कुटुंबाला फार मोठा मान होता.
सधन कुटुंबातून आल्याने वामनरावांचे शिक्षण चांगले झाले. इंग्रजी, तेलगू, उर्दू आणि मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. तरुण वयात त्यांनी हैद्राबादला स्थलांतर केले. कुटुंबाच्या आर्थिक पाठबळावर त्यांनी कापूस प्रक्रिया आणि सलग्न कारखान्यांची स्थापना केली. निजाम राज्यात रेल्वे स्थापित केल्या जात होत्या. गरीब जनतेला रोजगार मिळावा या उद्देशाने त्याचे कंत्राट घेत असत. वामनरावांची हैद्राबादमध्ये एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ख्याती झाली.
प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता, स्त्री शिक्षण, कुटीरोद्योग आणि रोजगार योजना याबाबत वामनराव नाईकांचे अतिशय पुरोगामी विचार होते. रावसाहेबांच्या विचारांशी वामनरावांचे सामाजिक विकासाबाबत विचार खूप मिळते जुळते होते. समाजकार्यात एक महत्वाचे सहकारी या नात्याने रावसाहेब वामनरावांकडे पाहात.
पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे मूळचे सावंतवाडीनजीकच्या एका लहानश्या खेड्यातले. श्रीपाद लहानपणापासून अतिशय हुशार. लहानपणापासून त्यांचा संस्कृतचा अभ्यास होता. त्यांना चित्रकला उपजत होती. पंडितजींनी पुढे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई येथून ‘पेंटिंग’ विषयातून डिग्री घेतली आणि देऊस्कर यांच्या सांगण्यावरून हैद्राबाद येथे स्थायिक होण्याचा निश्चय केला.
पंडितजी एक उत्तम चित्रकार तर होतेच परंतु त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व अतुलनीय होते. पंडितजींच्या विचारांवर टिळकांचा प्रभाव होता आणि समाजाचा विकास घडवायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार हा प्रथम उपाय आहे ह्या विचाराचे ते होते. समविचाराच्या पंडितजींच्या सहवासात रावसाहेबांची शिक्षण प्रसाराबाबतची प्रेरणा द्विगुणित होत असे.
वामनराव आणि पंडिजींच्या व्यतिरिक्त रावसाहेबांचा परिचय अनेक समविचारी व्यक्तींशी झाला होता. त्यात श्री. गणपत अफजलपूरकर, डॉ. किर्लोस्कर, श्री. अघोरनाथ चटोपाध्याय, श्री. विषणुपंत पोतदार, दत्तोपंत पिसोळकर, श्री. बोरमाणीकर, श्री. पांडुरंग जोशी, श्री. गणपत हर्डीकर, श्री. दातार हे प्रामुख्याने होते.
विवेक वर्धिनीची स्थापना
२५ ऑक्टोबर १९०७ हा दिवस हैद्राबाद संस्थानातील मराठी समाजासाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासाराखा होता. विजयादशमीच्या सुमुहूर्तावर ‘विवेक वर्धनी एजुकेशन सोसायटी’ ची स्थापना होत होती. ‘विवेक वर्धनी’ संस्थेला हैद्राबाद राज्याच्या इतिहासात नियतीने फार मोठे स्थान दिले होते. शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही फार मोठे काम संस्थेकडून होणार होते.
परंतु हा दिवस येण्याआधी रावसाहेब, वामनराव नाईक, पंडितजी सातवळेकर यांच्यासारख्या झपाटलेल्या व्यक्तींचे अनेक परिश्रम खर्ची गेले होते. पंडित सातोळेकरांच्या पुढाकाराने ‘विवेक वर्धनी सभा’ या नावाने संस्था स्थापण्यात आली होती. हैद्राबादमधील अनेक मान्यवर व्यक्ती या संस्थेचे सभासद होते. साहजिकच रावसाहेब आणि वामनराव नाईक देखील या संस्थेचे सक्रिय सभासद होते. हैद्राबादमध्ये एक माध्यमिक शाळा सुरु करण्याचं उद्दिष्ट्य या संस्थेचे होते. शाळेत इंग्रजी आणि मराठी माध्यमात शिक्षण दिले जावे असा मानस होता.
१९०१ पासून दत्तोपंत डिंगरे आणि करमरकर हे रेसिडेन्सी भागात एक मराठी शाळा चालवत होते. हैद्राबादमधील मराठी भाषिकांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे या उदात्त विचारांनी या दोघांनी ही शाळा सुरु केली होती. परंतु शाळेत जेमतेम १० विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि शाळेच्या वाढीस लागणारा पुरेसा निधी या दोघांकडे नव्हता. ४ ते ५ वर्षाच्या प्रयत्नानंतर दोघांनी विवेक वर्धिनी सभेकडे शाळा हाती घेण्याचा प्रस्ताव मांडला. संस्थेच्या एका सभेत याबाबत चर्चा झाली. पंडित सातोळेकरांनी विषयाला सुरुवात केली,
“मी यापूर्वीच याविषयीचं डिंगरे - करमरकर यांचं पत्र सभासदांसमोर ठेवलं आहे. दोघेही प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही.”
रावसाहेबांनी विषय उचलून धरला,
“माझ्या मते ही शाळा आपल्या संस्थेने चालवावयाला घ्यावी हे रास्तच आहे. आपल्या संस्थेचा उद्देश शिक्षण प्रसाराचाच आहे. आपणदेखील एखादी शाळा सुरु करण्याच्या तयारीत आहोत. तेंव्हा हा प्रस्ताव संस्थेच्या उद्दिष्टांशी अनुसरून आहे.”
उपस्थित मंडळींनी होकारार्थी मान डोलावली. वामनराव नाईकांनी पुष्टी दिली,
“हा प्रस्ताव नक्कीच चांगला आहे आणि आपण ही शाळा हाती घेणे योग्यच ठरेल. परंतु माझा एक प्रस्ताव आहे. आपली संस्था बहुउद्देशीय आहे. एका वेगळ्या शिक्षण संस्थेची स्थापना करावी आणि त्याअंतर्गत ही शाळा हाती घ्यावी. नवीन संस्थेचे सभासद तेच राहायला काही हरकत नाही”
पंडित सातोळेकरांनी अनुमती दिली,
“यास माझी हरकत नाही. परंतु शिक्षण संस्थेचे आणि शाळेचे नाव विवेक वर्धिनी असेच ठेवावे”
याला सर्वानीच अनुमती दिली. ठरल्याप्रमाणे कारवाई सुरु झाली. सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात रावसाहेबांनी आणि वामनराव नाईकांनी पुढाकार घेतला. संस्थेच्या स्थापनेचा दिवस विजयादशमीच्या सुमुहूर्तावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ ऑक्टोबर १९०७ च्या सभेची औपचारिक नोटीस सभासदांना पाठवण्यात आली.
नवीन संस्थेच्या कार्यकारिणीचे अध्यक्षपद सर्वानुमते रावसाहेबांना देण्यात आले. विवेक वर्धिनी एजुकेशन सोसाटीचे पहिले अध्यक्ष रावसाहेब झाले. सोसायटीच्या सचिवपदी वामनराव नाईकांचे नाव सर्वानुमते सूचवण्यात आले. कार्यकारिणीत रावसाहेब आणि वामनराव नाईकांशिवाय इतर दहा जणांची नावे निश्चित करण्यात आली.
प्राथमिक शाळेशिवाय पाचवी ते सातवी असे तीन माध्यमिक वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. हैद्राबादच्या इतिहासात ‘विवेक वर्धिनी’ ह्या एका महान पर्वाची सुरुवात झाली.