रावसाहेब न्यायमूर्ती असतानाच त्यांना १९२५ मध्ये मधुमेहाचा विकार जडला होता. मधुमेहाच्या विकाराने त्यांना शेवटच्या काळात बराच त्रास दिला. वय आणि व्याधी विसरून रावसाहेब काम करीत असल्याने त्यांचा हा विकारही पुढे बळावला. त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू देखील झाला आणि फार कमी दिसू लागले. वाचता येणेही त्यांना अशक्य झाले. समोरचा माणूस सुद्धा ते अंदाजावरून ओळखत.
अखेरचे दिवस
रावसाहेबांनी मुंबईला जाऊन डोळ्यांचा इलाज करावा यासाठी विनायकरावानी आग्रह धरला,
“अण्णा, मुंबईमध्ये डॉक्टर डगन नावाचे प्रसिद्ध इंग्रज नेत्र वैज्ञानिक आहेत. आपण त्यांच्याकडून तुमचा इलाज करून घेऊ.”
रावसाहेबांनी ते मान्य केले. विनायकराव मार्च १९३२ मध्ये रावसाहेबांना घेऊन मुंबई येथे आले. डगन डॉक्टरांनी रावसाहेबांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. एका डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर ते पुण्यात येऊन राहिले. रावसाहेबांचे परममित्र राघवेंद्रराव शर्मा पुण्यातच राहत असत. राघवेंद्रराव रावसाहेबांना मोठ्या भावाप्रमाणे मान देत. रावसाहेबांची प्रकृती चांगली असल्यानं विनायकरावांनी रावसाहेबांना राघवेंद्रराव यांच्या देखरेखखाली पुण्यात विश्रांतीसाठी ठेवले. काही अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी विनायकरावांना हैद्राबादला जाणे आवश्यक होते. पण त्यांचा पाय निघत नव्हता. तेंव्हा राघवेंद्रराव विनायकरावांना म्हणाले,
“विनायकराव, तुम्ही निश्चिन्त राहा. रावसाहेब मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांची काळजी घेणं ही माझी संपूर्ण जबाबदारी राहील. अगदीच वेळ पडली तर तुम्हाला तार पाठवून बोलावून घेऊ."
विनायकराव जड पावलांनी हैद्राबादला गेले. २० मे १९३२ पर्यंत त्यांची प्रकृती चांगली होती. त्यादिवशी रात्री मात्र ती थोडी बिघडली. एका डॉक्टरचे औषधपाणी चालू होते. रावसाहेब बिछान्यावर शांत झोपलेले होते. राघवेंद्रराव बाजूला खुर्चीवर बसले होते. रावसाहेबांची प्रकृती घटकापळी खालावताना राघवेंद्ररावांना दिसत होती.
राघवेंद्ररावांचं मन अनेक विचारांनी भरून आलं होतं.
“रावसाहेब म्हणजे राष्ट्राच्या उभारणीतील एक युगपुरुष. उद्याची सक्षम पिढी निर्माण करण्याचा ध्यास घेऊन उभं आयुष्य जगला. नव्या पिढीला योग्य शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्या मनावरचं अनिष्ट चालीरितींचं खूळ निघालं पाहिजे, तेंव्हाच ही पिढी एका सुराष्ट्राची निर्मिती करेल.”
राघवेंद्ररावांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
“स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न आपल्यासमोर प्रत्यक्षात उतरणार नसलं तरीही पुढच्या पिढीसाठी त्याचा पाया रचणारा हा युगपुरुष”
दुसऱ्या दिवशी सकाळी राघवेंद्ररावानी आणखी एका प्रसिद्ध डॉक्टरांना त्यांची प्रकृती दाखवली. रोग हाताबाहेर गेला होता. रावसाहेब मधुमेहामुळे कोमात गेले. २१ मे १९३२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास रावसाहेब यांचा पुणे येथे अंत झाला.
बाजूला बसलेल्या राघवेंद्ररावांच्या डोळ्यात आसवांचा बांध फुटला…
सुधारवादी यूगपुरुष हा | सोडूनी जाई धाम ||
एकलाच त्या अंत्य समई | राघवरुपी बलराम ||
महानिर्वाण
विनायक रावांना २१ तारखेला तार आली. परंतु ती मिळेपर्यंत मुंबईकडे जाणारी रेल्वे निघून गेली होती. त्यामुळे मोटारीने निघून ते दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पुण्यात पोहोचले. सायंकाळी पाच वाजता रावसाहेबांची अंत्ययात्रा निघाली. त्यात रावसाहेबांचे अनेक मित्र आणि चाहते सामील झाले होते. रावसाहेबांचा मृत्यू झाला त्या वेळी वामनरावजी नाईक महाबळेश्वरला होते. रावसाहेब गेल्याचे कळताच ते ताबडतोब पुण्यात आले. आपला दीर्घकाळचा सहकारी दिवंगत झाल्यामुळे नाईकांना फार दुःख झाले. अंत्ययात्रेत ४०० ते ५०० लोक सामील झाले होते. त्यात फर्ग्युसन कॉलेज आणि सर परशुरामभाऊ कॉलेजची मंडळी होती. हैद्राबादहून पांडुरंग जोशी, दादासाहेब पीलखाने वगैरे मंडळीही आली होती. रँगलर परांजपे आणि इतर मान्यवरांनी स्मशानात रावसाहेबांना श्रद्धांजली वाहणारे भाषण केले.
हैद्राबाद येथील सामान्य हिंदू नागरिकाला आपला एक आधार गेल्याचे वाटले. मुस्लिम नागरिक आणि अधिकारी यांच्या मनात देखील रावसाहेबांबद्दल आदर होता. त्यांनीही रावसाहेबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. २४ मे रोजी हैद्राबाद उच्च न्यायालय, जुडिशियल कमिटी, आणि रेवेन्यू बोर्डाची कार्यालये न्या. केशवराव कोरटकरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी बंद राहिली. २७ तारखेला नागरिकांची एक मोठी शोकसभा विवेक वर्धिनी थिएटरमध्ये झाली. निजाम विजय आणि इतर वृत्तपत्रांनी आदरांजली वाहणारे लेख लिहिले.