हायकोर्ट जज्जाच्या जागेवर नेमणूक
दिनांक २० जून १९२२. निजाम विजयच्या पहिल्या पानावर बातमी झळकली,
“आम्हास कळविण्यास आनंद वाटतो की श्री केशवराव हायकोर्ट वकील यांची हायकोर्ट जज्जाच्या जागेवर स्पेशल फर्मानाद्वारे नेमणूक करण्यात आली आहे. या बातमीने सर्वांना अतिशय आनंद झाला असून हजारो लोकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. निजाम विजय तर्फे रावसाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अर्थात, सार्वजनिक बाबतीत आम्ही त्यांच्या नेतृत्वास मुकलो आहोत याविषयी वाईट वाटते.
श्री केशवराव वकील यांचे सार्वजनिक रित्या अभिनंदन करण्याकरता आणि निजाम साहेबांचे आभार मानण्याकरता शुक्रवार तारीख १८ रोजी विवेक वर्धिनी थिएटर मध्ये सायंकाळी सहा वाजता हिंदू नागरिकांची सभा भरवण्यात येणार आहे.”
हैद्राबाद हायकोर्टात पूर्वी इतर न्यायाधीशांशिवाय एक हिंदू शास्त्री आणि एक मुसलमान मुफ्ती अशा दोन जागा होत्या. हिंदू धर्मशास्त्राच्या मुद्द्यावर शास्त्रांचे मत घेतले जाई व मुसलमान धर्मशास्त्राच्या मुद्द्यावर मुफ्तीचे मत घेतले जाई.
पुढे शास्त्रांची जागा निराळी न ठेवता एक जज वाढवण्यात आला आणि प्रथा अशी ठेवण्यात आली की हायकोर्टातील एक जज तरी हिंदू असावा. परंतु बऱ्याच वर्षापासून या हिंदू जज्जाच्या जागेवर कोणतीच नेमणूक झालेली नव्हती. कोर्टातल्या सहा जजांपैकी एकही जज हिंदू नव्हता. त्यामुळे हिंदू समाजात नाराजी होती.
१९२१ साली सर अली इमाम हे हैद्राबादच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून काम करू लागले. इमाम साहेबांच्या लक्षात ही गोष्ट आली. इमाम साहेबांना माणसाची पारख होती. रावसाहेबांच्या कामाची ख्याती सर्वश्रुत होती. इमाम साहेबांनी ‘ॲडिशनल जज’ या जागी रावसाहेबांची नेमणूक केली.
रावसाहेबांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट होती. आजतागायत या जागेवर कोणताही हिंदू जज नेमला गेलेला नव्हता. हा मान रावसाहेबांना मिळत होता. परंतु रावसाहेबांची त्याकाळी वकिली जोरात होती. जज म्हणून मिळणारा पगार हा वकिलीत मिळणाऱ्या मिळकतीपेक्षा खचितच कमी होता. परंतु मिळणाऱ्या मिळकतीवरून निर्णय घेणारे रावसाहेब नव्हते. कोणत्याही गोष्टीचा संपूर्ण विचार करूनच ते योग्य निर्णय घेत.
रावसाहेबांच्या समाज कार्यात रावसाहेबांना आखडता हात घ्यावा लागणार होता. कदाचित रावसाहेबांचं समाज नेतृत्व डोईजड होईल या भीतीने सरकारने त्यांना या सुवर्ण शृंखलांमध्ये जखडले असावे. परंतु हायकोर्ट जजचे पद घेतल्यावर हिंदू जनतेचे अनेक अडकलेले निर्णय धसाला लावता येतील यात रावसाहेबांना आनंद होता. तसेच हिंदूंच्या प्रतिष्ठेत यामुळे निश्चितच भर पडणार होती. या साऱ्याचा विचार करून रावसाहेबांनी हे पद मान्य केले होते.
रावसाहेबांनी गेल्या पंचवीस वर्षात हैद्राबाद मधल्या मराठी आणि हिंदू बांधवांसाठी असंख्य कामे केली होती. शिक्षण प्रसार, वाचनालय व नियतकालिके, समाज जागृती अशा अनेक विषयात आमूलाग्र काम केले होते. जज्जपदी नेमणूक झाली आणि रावसाहेबांच्या डोळ्यासमोर सारा इतिहास आला,
शिक्षण प्रसार
विवेक वर्धिनीचे लावलेले रोपटे फोफावत होते. १० विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या शाळेत १९२२ पर्यंत ७०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. वामनराव नाईकांनी ३०,००० रुपये किमतीची जागा घेऊन संस्थेच्या इमारतीचा पाया घालून दिला होता. तसेच वामनराव नाईकांच्या पुढाकाराने १९१६ साली विवेक वर्धिनीला कन्या शाळा जोडण्यात आली होती. विवेक वर्धिनीचे थेटर हैद्राबादमधील सामाजिक उपक्रमाचे केंद्र झाले होते. टिळक पुण्यतिथी, ना. गोखले पुण्यतिथी, गोकुळ अष्टमी, दसरा, येशू दिन सोहळा यासारखे दिन या थेटरमध्ये साजरे केले जात होते. विवेक वर्धिनीच्या पटांगणात ‘सामाजिक परिषद’ सारख्या मोठ्या सभा भारवल्या जात होत्या. विवेक वर्धिनीच्या व्यवस्थापनात रावसाहेबांचा सहभाग तर होताच परंतु वेळोवेळी आर्थिक मदतही असे.
तिकडे गुलबर्ग्यात विठ्ठलराव देऊळगावकरांचा अकाली मृत्यू झाला असला तरी नूतन विद्यालयाचे त्यांचे सहकारी नूतन विद्यालयाची धुरा नेटाने सांभाळत होते. नूतन विद्यालयाची दिवसेंदिवस भरभराट होत होती. रावसाहेब नूतन विद्यालयाच्या संपर्कात असत आणि वेळोवेळी आर्थिक मदत देखील करत.
रावसाहेबांचा संपर्क औरंगाबादच्या सरस्वती भुवन आणि शारदा मंदिर या दोन शाळांशी होता. या शाळांना वेळोवेळी आर्थिक आणि इतर स्वरूपाची मदत ते करत. याशिवाय पुण्याचे श्री. विश्वनाथ केसरकर यांनी एक्सलसियर हायस्कूलची स्थापना केली होती. केशवराव त्या संस्थेचे बरीच वर्षे उपाध्यक्ष होते.
प्रौढ शिक्षण
मुलामुलींना शिक्षण देण्याकरता ज्याप्रमाणे शाळा असतात त्याप्रमाणे प्रौढांना शिक्षण देण्यासाठी ग्रंथसंग्रहालय आणि वर्तमानपत्र असावीत यावर रावसाहेबांचा ठाम विश्वास होता. यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. अनेक वर्तमान पत्रे, नियतकालिके आणि ग्रंथ संग्रहालये यांना त्यांनी प्रोत्साहन आणि वेळोवेळी आर्थिक मदत केली.
लक्ष्मणराव फाटकांनी सुरु केलेल्या ‘निजाम विजय’ वृत्तपत्रानं मूळ धरले होते. ‘निजाम विजय’ जणू हैद्राबाद संस्थानाच्या इतिहासाची साक्ष होता. संस्थानातल्या मराठी नेतृत्वाच्या प्रत्येक हालचालींची नोंद ठेवत होता. मराठी जनतेच्या नाराजीला वाचा फोडत होता. तरुण साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम करत होता. रावसाहेबांचा निजाम विजयच्या कामाला नेहमी पाठिंबा होता. निजाम विजयच्या आर्थिक अडीअडचणीत रावसाहेब यांचा हातभार असे.
मुंबई-पुणे या ठिकाणी जशी मराठी ग्रंथालये आहेत त्याच पद्धतीवर हैद्राबादमध्ये मराठी ग्रंथ संग्रहालय असावे, अशी त्यांची फार इच्छा होती. त्यांनी १९२२ साली हैद्राबादमध्ये श्री. चि. नी. जोशी यांच्या सहकार्याने एक मराठी ग्रंथसंग्रहालय स्थापन केले. त्याच बरोबर ‘दक्षिण साहित्य संघ’ या संस्थेचे रावसाहेब अध्यक्ष होते. औरंगाबादमध्ये आनंद कृष्ण वाघमारे यांनी ‘बळवंत मोफत वाचनालयाची’ सुरुवात केली होती रावसाहेबांचे या प्रकल्पाला कायम प्रोत्साहन असे.
हैद्राबाद येथे ‘नागरिक’ या नावाने एक वर्तमानपत्र चाले. त्यामागे रावसाहेबांचा महत्वाचा वाटा होता. संस्थानात मराठीतून प्रसिद्ध होणारे एखादे मासिक असावे अशी रावसाहेबांची इच्छा होती त्याप्रमाणे काही तरुणांना हाताशी घेऊन ‘राजहंस’ नावाचे मासिक रावसाहेबांनी काढले. केवळ मराठीच नव्हे तर ‘रयत’ या उर्दू साप्ताहिकासही रावसाहेबांची मदत होती.
पुणे येथील ‘ज्ञानप्रकाश’ या सुप्रसिद्ध वर्तमान पत्राबद्दल रावसाहेबांना फार अभिमान होता. जेव्हा आर्यभूषण छापखान्यास आणि ज्ञानप्रकाश कार्यालयास आग लागली त्यावेळी रावसाहेबांनी ५,००० रुपयाची देणगी दिली होती.
‘केसरी’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ या दोन वर्तमानपत्रावर हैद्राबाद संस्थानात सरकारने बंदी आणली होती. ही बंदी उठवावी यासाठी रावसाहेबांनी बरेच प्रयत्न केले. त्यापैकी ‘ज्ञानप्रकाश’ वरची बंदी उठवण्यात रावसाहेब यशस्वी झाले, परंतु केसरी वरची बंदी ते उठवू शकले नाहीत
साहित्य संमेलन आणि परिषद यात रावसाहेबांना विशेष रुची होती. ‘प्रजा शिक्षण परिषद’ आणि ‘विदर्भ साहित्य संमेलन’ यांत रावसाहेबांचा क्रियाशील सहभाग होता.
लोकजागृती
रावसाहेब समाजातल्या अनिष्ट चालीरितींच्या विरोधात होते. हैद्राबाद संस्थानात इतर क्षेत्रांबरोबरीने काम करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये देखील लोकजागृती बाबत दोन गट होते. एक गट सामाजिक सुधारणेच्या विरुद्ध होता. त्यांना समाजात ज्या सनातनी रुढी आहेत त्यात कोणताही फरक पडू नये, असे वाटत होते. दुसऱ्या गटाचे रावसाहेब प्रमुख होते. समाजसुधारणा झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही असे रावसाहेबांचे मत होते. त्यांच्या मते समाजाच्या चालीरितीत सुधारणा करणे हे अत्यंत आवश्यक असून समाजाच्या चैतन्याचे द्योतक आहे.
प्राथमिक तसेच स्त्री शिक्षण, प्रौढ शिक्षण, अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलन, बहुपत्नी आणि बालविवाह निषेध, विधवा विवाह इत्यादीसारख्या संवेदनशील विषयावर परिषद मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण करण्याचं कार्य रावसाहेब वेगवेगळ्या मंचावरून करत होते.
रावसाहेबांनी वामनराव नाईक, राघवेंद्र शर्मा यांच्याबरोबर सुरु केलेली ‘सामाजिक परिषद’ अपेक्षेपेक्षा जास्त परिणामकारक झाली होती. सामाजिक परिवर्तनात आर्यसमाजाचा मोठा वाटा होता. आर्यसमाज म्हणजे रावसाहेब आणि रावसाहेब म्हणजे आर्यसमाज असे समीकरण झाले होते. याच धर्तीवर रावसाहेबांच्या अध्यक्षतेखाली ‘स्टेट रिफॉर्म कॉन्फरेन्स’ या संस्थेची स्थापना झाली होती. याचे सचिव राघवेंद्र वकील होते.
हिंदू महासभा, हिंदू धर्म संमेलन, आदी हिंदू लीग यासारख्या सनातनी संस्थांबरोबर देखील रावसाहेब जोडून होते. मूर्तिपूजा, अस्पृश्यता, विधवा विवाह, इत्यादी विषयात रावसाहेबांचे या संस्थांशी मतभेद असले तरी समान मान्यता असलेल्या विषयांवर रावसाहेब या संस्थांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होते.
इन्फ्लुएंझा
१९१८ साली संपूर्ण हिंदुस्तानात इन्फ्लुएंझाची साथ आली आणि त्यात देश होरपळून निघाला. हैद्राबादमध्ये देखील इन्फ्लुएंझाने थैमान घातले. कुटुंबच्या कुटुंब या साथीला बळी पडत होती. शहरात डॉक्टर आणि वैद्यांकडे माणसांची एवढी गर्दी होऊ लागली की सर्वांना उपचार देणे अशक्य होऊन बसले.
त्यावेळी लोकांना मदत करण्याकरता हैद्राबादकरांनी ‘सोशल सर्विस लीग’ या नावाची संस्था काढली. रावसाहेब त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरीही दवाखाना ठेवला होता. त्यात ते स्वतः बसत आणि आपल्या हाताने लोकांना औषधे देत. त्यांच्या हाताखाली ५० ते ६० स्वयंसेवक काम करत होते. रोज त्यांच्या दवाखान्यातून साधारणतः १००० रोग्यांना औषधे दिली जात होती. रावसाहेब मधून मधून स्वतः रोग्यांच्या घरी जात आणि त्यांची चौकशी करत. खाण्याची सोय नसल्यास ती करून देत. लोकांची अशी सेवा करण्यात त्यांनी हिंदू-मुसलमान असा भेदभाव कधीच केला नाही.
ह्या त्यांच्या कामगिरीची सरकारनेही दखल घेतली आणि सरकारकडून त्यांना दिवाण सर अली इमाम यांच्या हस्ते एक प्रशस्तीपत्र देण्यात आले.
खिलाफत चळवळ
हैद्राबादमधील मुसलमानवर्गात देखील रावसाहेबांबद्दल आदर होता. खिलाफत चळवळीत रावसाहेबांनी भाग घेतला. या चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मोठ्या मोठ्या सभा हैद्राबाद संस्थानात झाल्या. त्यात रावसाहेबांनी अनेक वेळा भाषणे दिली. मुस्लिम मंडळी रावसाहेबांना ‘मौलवी’ किंवा ‘मौलाना’ अशा ‘ज्ञानी’ या अर्थाच्या किताबाने संबोधत.
एके दिवशी संध्याकाळी खिलाफतची सभा होती. त्या सभेचे अध्यक्षस्थान रावसाहेबांकडे होते. संयोगाने त्याच दिवशी रावसाहेबांच्या मुलीचे लग्न होते. रावसाहेब लग्न आटोपून सभेला हजर झाले. मुसलमानांना रावसाहेबांच्या या कर्तव्यनिष्ठतेचे कौतुक वाटले. सभा संपल्यावर रावसाहेबांना खुर्ची सकट उचलून मिरवीत मोटारी पर्यंत नेण्यात आले.
विदर्भ साहित्य संघ
अमरावती येथील सुप्रसिद्ध कवी भूषण बळवंत गणेश खापर्डे यांनी ‘विदर्भ साहित्य संघ’ या नावाने संस्था सुरू केली. संघाचे कार्यक्षेत्र वऱ्हाड, खानदेश, मध्य प्रांत आणि निजाम इलाख्यातील महाराष्ट्र हे ठरवण्यात आले.
संस्थेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ठरवण्यात आली: १. प्राचीन ग्रंथ, लेख आणि ऐतिहासिक कागदपत्र गोळा करणे, २. मराठी वाङ्मय विषयक चर्चा करणे, ३. सदर ग्रंथ व कागदपत्र स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणे, ४. अर्वाचीन ग्रंथकारांस बक्षीस देणे, ५. निरनिराळ्या जागी महत्त्वाच्या विद्वान लोकांची व्याख्याने व सभा भरवणे, ६. मराठी वाङ्मय विषय अभ्यासास उत्तेजन देणे, ७. नवीन ग्रंथरचना करवणे, ८. ग्रंथांची व ग्रंथकारांची जंत्री तयार करणे, ९. संघाचे एक ग्रंथ संग्रहालय व वस्तुसंग्रहालय निर्माण करणे .
संस्थेची पहिली परिषद १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी रावसाहेबांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे चिटणीस श्री. बळवंतराव खापर्डे यांच्याकडे आले. याशिवाय तीन सहाय्यक चिटणीस निवडण्यात आले. त्यात श्री गोळेगावकर हे एक होते.