कोरट येथे बालपण
संतुकराव कोरटकर, त्यांच्या पत्नी गोदावरीबाई, चार मुले आणि एक मुलगी असे सात जणांचे हे कुटुंब. मराठवाड्याच्या तत्कालीन परभणी जिल्ह्यातल्या कोरट गावातले हे ब्राह्मण कुटुंब. मोठा मुलगा तात्या, तर दुसऱ्या क्रमांकावर केशव. केशवनंतरची दोन भावंडे, नारायण आणि गणपत. एकुलती बहीण केशवहून थोरली. तिचे नाव बाळूबाई. संतुकराव व्यवसायाने जोशी. गावातल्या सावकाराकडे दरमहा तीन रुपयांवर नोकरीला होते. सावकाराच्या घरची नित्य पूजा, याशिवाय गावात पूजापाठ सांगून उदरनिर्वाह करीत. आपल्या व्यवसायाचा संतुकरावांना अभिमान होता परंतु सात जणांच्या उदरनिर्वाहापुरतीच त्यांची मिळकत होती. मुलांवरती शिक्षण किंवा त्यापलीकडे जाऊन इतर खर्च करण्याची संतुकरावांची ऐपत नव्हती.
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या नंतरचा तो काळ. असफल झालेल्या या युद्धाच्या भारतीयांच्या हृदयावरल्या जखमा अजून संपूर्ण भरल्या नव्हत्या. युद्धसमयी देशावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होते. युद्ध मेरठ येथील लष्कर छावणीतील बंडापासून सुरू झाले आणि लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले आणि लगोलग दिल्लीवर हल्ला चढवून दिल्लीत ब्रिटिश सैन्याला हरवले. बहादूरशहा दुसरा याला हिंदुस्तानचा बादशहा घोषित केले गेले. ब्रिटिश सैन्य या सर्व प्रकाराने घाबरले. परंतु ईस्ट इंडिया कंपनीने लवकरच अधिक सैन्याची कुमक मागवून अखेरीस दिल्ली पुन्हा काबीज केली. पण झाशी, अवध आणि लखनौतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खूप वेळ लागला. जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात अखेरीस इंग्रजांचा विजय झाला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इत्यादी मराठी नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. १८५७ च्या सुरुवातीला कंपनीने नव्या प्रकारच्या बंदुका आणल्या होत्या. त्या बंदुकांची काडतुसे गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे दातांत धरून उघडावी लागत. यामुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि शिपायांनी बंड पुकारले. परंतु हे कारण केवळ निमित्तमात्र होतं. खरं कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हेच होते.
युद्धाचे पडसाद म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात आणले गेले आणि इंग्लंडच्या राणीचा प्रतिनिधी या नात्याने व्हॉईसरॉय नेमण्यात आला. देशाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार या व्हॉईसरॉयला देण्यात आले. देशाच्या व्यवस्थापनात देशातील जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याचे धोरण मांडण्यात आले. परंतु हा सर्व वरवरचा देखावा आहे हे लवकरच उघडकीस आले. सैन्यात आणि इतर सरकारी नोकऱ्यांत दुजाभाव, जनतेवरील जाचक राजवट आणि दंडेलशाही चालूच राहिली, किंबहुना वाढतच गेली.
ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकायचे असेल तर चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे याची जाणीव समाजातल्या शिक्षित वर्गाला जाणवू लागली. चळवळ जर घराघरात पोहोचवायची असेल तर प्रथम सामान्य जनतेला शिक्षित करणे आवश्यक आहे. समाजातल्या अनिष्ट चालीरिती बंद झाल्या पाहिजेत आणि सामान्य जनता आपल्या स्वातंत्र्यासाठी जागृत झाली पाहिजे. यातूनच या काळात स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, बॅ. महादेव रानडे, बाळ गंगाधर टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले इत्यादींसारखे विचारवंत उदयाला आले, ज्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे महान कार्य केले.
या सर्वांपासुन अनभिद्न्य, संतुकरावांचे कुटुंब कोरट गावात उदरनिर्वाह करीत होते. त्यातून मराठवाड्यावर निजाम राज्य असल्याने हिंदुस्तानात वाहणारे राजकीय प्रवाह त्यांच्या पर्यंत पोहोचणे अपेक्षितही नव्हते. घरातच काय, पण आसपासच्या पंचक्रोशीत मुलांच्या शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता कोणालाही वाटत नव्हती. परंतु केशवला मात्र शिक्षणाची मनस्वी आवड होती.
केशवचा जन्म १८६७ सालचा. परभणी जिल्ह्यातच पूरजळ, तालुका वसमत येथे त्याच्या आजोळी जन्म झाला. कोरट काय किंवा पूरजळ काय, दोन्हीही खेडीच. गावात एकही शाळा नाही. वडील देवभक्त. त्यांचे पूजापाठाचे दांडगे पाठांतर. मग केशव वडिलांसोबत बसून पूजा-आरती पाठ करू लागला. त्याचे पाठांतर पाहून संतुकराव ज्या सावकाराकडे काम करीत त्या सावकाराला देखील आश्चर्य वाटले. त्याने आपल्या घरची पूजा केशवच्या हाती सोपवली. त्याबदल्यात थोडा आर्थिक मोबदलाही देऊ केला. केशवचे थोरले बंधू; तात्या देखील त्याच सावकाराकडे पाच रुपये दरमहा पगारावर काम करू लागले. गावात शाळा नसल्याने शालेय शिक्षणाची काहीच सोय नव्हती. जे थोडेबहुत शिक्षण झाले ते त्याने आपल्या परिश्रमानं मिळवले. दुसऱ्याची पुस्तके आणून केशव स्वतः आपल्या हाताने त्याची नक्कल करून घेई. पण या सर्वामुळे केशवचे मोडी आणि उर्दू लेखन अतिशय वळणदार आणि सुवाच्य झाले. त्याचा त्याला पुढील आयुष्यात फार उपयोग झाला.
पाहता पाहता केशव ९ वर्षांचा झाला. त्याची शिक्षणाची कुचंबणा वाढत गेली. संतुकरावांच्या देखील ते ध्यानात आले. पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता, त्यामुळे नाईलाजाने ते गप्प राहिले. शिक्षणासाठी वसमत किंवा परभणीला शिक्षणासाठी पाठवण्याची आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नाही हे केशव देखील पुरेपूर जाणून होता पण शिक्षणाविना केशवला चैन पडत नव्हते. अखेर संतुकरावांनीच तोडगा काढला. संतुकरावांची मोठी मुलगी बाळूबाई हिचा विवाह हरिराव शेष यांच्याबरोबर झाला होता. हरिराव शेष त्याकाळी गुलबर्गा शहरात स्थायिक होते. केशवला त्यांच्याकडे राहण्यासाठी पाठवण्याची कल्पना संतुकरावांच्या मनात आली. संध्याकाळची प्रार्थना झाल्यावर संतुकरावानी केशवला जवळ बोलावले.
थोड्या निराश आवाजात संतुकराव म्हणाले,
“केशवा, तुझी शिक्षणाची ओढ मला कळते रे, पण एका मुलावर एवढा खर्च करणं मला खरंच अवघड आहे”
मुले संतुकरावांना अण्णा म्हणत. केशव लगेच उत्तराला,
“अण्णा, हे का मला कळत नाही? जसं होईल तसं बघू. उगीच मनाला खंत लावून घेऊ नका, अण्णा …”
नऊ वर्षांच्या त्या लहानग्या कडून संतुकरावांना हे उत्तर अपेक्षित नव्हते. केशव त्रागा करेल, हट्ट करेल असे काहीतरी संतुकरावांना वाटले होते. संतुकरावांचा गळा भरून आला. क्षणभर थांबून संतुकराव म्हणाले,
“तसं नव्हे रे, मला काय वाटतं,… आपले हरिराव आहेत ना? ते गुलबर्ग्यास स्थायिक आहेत. त्यांच्याकडे तू जाऊन राहिलास तर त्यांना एक माणूस जड नाही”
केशवाच्या मनात आनंदाची उकळी फुटली. पण त्यानं चेहेऱ्यावर तसे काही दिसू दिले नाही. संतुकराव पुढं म्हणाले,
”पण तुझ्या शिक्षणाचा खर्च मात्र त्यांनी करावा हे योग्य ठरणार नाही. तेंव्हा तुलाच छोटी मोठी कामे करून अर्थार्जन करावं लागेल आणि त्यातूनच होईल तेवढे शिक्षण घ्यावे लागेल”
केशवाला ही एक फार मोठी संधी होती. त्याने लगेच अट मान्य केली.
त्या पोर वयात केशवला काही मोठ्या आकांक्षा किंवा ध्येय नव्हती. केवळ शिक्षण घेता येईल, भरपूर पुस्तके वाचता येतील, मोठ्यांच्या भेटी होतील यातच त्याला समाधान होते. याच विचारात त्याला रात्रभर झोप आली नाही. आई वडिलांची सावली सुटेल याचे दुःख त्याला होतेच. परंतु आलेल्या संधीचे सोने करण्याची उत्सुकता त्यामानाने कितीतरी पटीने जास्त होती. दुसऱ्या दिवशी संतुकराव केशवाला गुलबर्ग्याला घेऊन निघाले. आपले उत्तुंग भविष्य पाठीशी घेऊन केशवने वयाच्या नवव्या वर्षी आपले घर सोडले.