तहसील कचेरीत नोकरी 

साल १८८२. उर्दू आणि फारसी भाषेचा अभ्यास आणि प्राथमिक शिक्षण यात सहा वर्षे कशी निघून गेली ते  केशवला कळले देखील नाही. केशव आता १५ वर्षाचा झाला होता. वयाच्या अटीचा विचार करता केशव आता सरकार दफ्तरी  काम करण्याच्या वयाचा झाला होता. निजाम राज्यात हिंदूंना फारशी महत्वाकांक्षा बाळगण्यास वाव नव्हता. लवकरात लवकर एखादी सरकारी नोकरी मिळवावी आणि मिळेल त्या पगारावर पुढील आयुष्य क्रमावे. कोणतेही मोठे पद किंवा अधिकाराची जागा एखाद्या हिंदूला मिळेल हे क्वचितच. ठरलेल्या शिरस्त्यास अनुसरून हरिरावांनी आपल्या ओळखीतून केशवला १५ रुपये महिना पगारावर तहसिल कचेरीत लेखनिक म्हणून चिटकवून दिले. तहसील कचेरीत येणारे पक्षकार हे सहसा अशिक्षित असत. त्यातून उर्दू जाणणारे तर फारच कमी. पक्षाचे म्हणणे समजावून घेऊन उर्दूमध्ये अर्ज तयार करण्याचे काम केशवकडे आले. 

तहसील कचेरीतील लेखनिकाला आपल्या पगाराव्यतिरिक्त पक्षकाराकडून वरची कमाई मिळण्याचा प्रघात होता. परंतु हे केशवच्या तत्वात बसत नव्हते. त्याच्या कामाच्या सचोटीने केशव एव्हाना तहसीलदाराच्या मर्जीतला गणला जाऊ लागला होता. 

त्यामुळे विना सायास वरची कमाई करणे केशवला सहज शक्य होते. परंतु केशवने यास साफ नकार दिला. तहसीलदाराने देखील केशवला याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. एक दिवशी तहसीलदाराने केशवाला आपल्या कक्षात बोलावले. 

समजावणीच्या सुरात तहसीलदार केशवला म्हणाला, 

“केशवा… अरे वरची कमाई घेण्यात संकोच बाळगण्याचं कारण नाही. तसा प्रघातच आहे. तुझ्यापुढं सारं आयुष्य पडलय. स्वतःचा आणि तुझ्या भावी कुटुंबाचा तरी विचार कर …” 

त्यावर केशवने ठामपणे उत्तर दिले,

“कामाचा मोबदला मला सरकार पगाराद्वारे देते, मग या वरच्या कमाईवर माझा काय अधिकार आहे? मला असे  उत्पन्न अजिबात नको … ”

तहसीदाराने केशवला समजावण्याचा नाद नंतर सोडला. परंतु, मनोमन तहसीदाराचे केशवबाबतचे आदरयुक्त प्रेम अनेक पटीने वाढले. यात केशवचे अर्थार्जन खूप कमी होत असले तरी पक्षकार आणि अधिकारी केशवला सन्मानपूर्वक वागणूक देऊ लागले. यातून केशवचा लोकसंग्रह वाढीस लागला.