वकिली 

साल १८९०. केशवचे वय जेमतेम २३ वर्षाचे होते.  केशवला अव्वल दर्जाच्या वकिलीची सनद  मिळाली होती. गुलबर्ग्याच्या ज्या कोर्टात केशवने  लेखनिकाचे काम केले, त्याच ठिकाणी आता केशव एक वकील म्हणून पाय ठेवत होता. कोरटयाचा केशव आता केशवराव कोरटकर वकील म्हणून समाजात सन्मानाने ओळखले  जाऊ लागला. 

केशवराव पहिल्या दिवशी कोर्टात हजर झाले.  वास्तविक केशवरावांनी सरळ वकील कक्षात जाणं अपेक्षित होते. पण केशवराव लेखनिक म्हणून जेथे बसत होते त्या कक्षेत ते प्रथम गेले. केशवराव आत येताच अंमलदारासकट सारे उभे राहिले. केशवराव हसून म्हणाले,

“अरे, तुम्ही मला ओळखले नाही की काय? मी वकील झालो म्हणून काय झालं? मी तोच केशव आहे. वकील झालो म्हणून मला शिंग फुटले की काय?” 

सर्वांची विचारपूस करून मगच केशवराव वकील कक्षात गेले. केशवरावांचा साधेपणा सर्वांना खूपच भावला. केशवरावांबद्दलचा त्यांचा आदर आणिकच वाढला. 

पाहता पाहता केशवरावांचा वकिलीवर जम बसला. त्यांची सचोटी, साधेपणा, विषयावरील पकड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बांधवांसाठी काहीतरी भरीव करून दाखवण्याची एक जिद्द, या सर्वांचा जो व्हायचा तो परिणाम झाला. केशवराव कोरटकार हे एक यशस्वी वकील म्हणून नावारूपाला आले. 

केशवराव खटल्याची पूर्ण तयारी केल्याशिवाय कोर्टासमोर कधीही उभे राहत नसत. खटल्याची पूर्ण माहिती वाचून आणि समजावून घ्यायलाच पाहिजे हा त्यांचा स्वतःसाठी केलेला दंडक होता. पक्षकार वकिलास पुरेशी माहिती देत नाहीत, किंवा त्यांना त्या माहितीचे पुरेसे महत्व कळत नसे. अशावेळी कागदपत्रातून योग्य माहिती मिळवणे हेच वकिलाचे यश असते. विशेषतः सत्र कोर्टात काम चालवताना खालच्या कोर्टातील खटल्याचे कागद पाहणे अतिशय महत्वाचे ठरते. याची पूर्ण जाणीव असल्याने केशवराव खटल्याच्या सर्व कागदपत्रांचा  काळजीपूर्वक अभ्यास करत. 

केशवराव ब्रिटिश कोर्टाच्या निकालांचा देखील अभ्यास करत. ब्रिटिश कोर्टातील निकाल इंग्रजीत असल्याने त्यांनी इंग्रजीचा थोडा फार अभ्यास केला. ब्रिटिश कोर्टाच्या मुंबई, मद्रास, अलाहाबाद आणि कलकत्ता या कोर्टाच्या निकालांचा उर्दू अनुवाद होत असे. त्याचा देखील केशवराव सविस्तर अभ्यास करीत. 

त्या काळी वकिलांची संख्या खूपच कमी होती. त्यातून केशवरावांसारखे हिंदू वकील ज्यांचे मराठी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होते आणि जे आपला दावा प्रभावीपणे मांडू शकतील असे तर फारच कमी होते. समाजात प्रतिष्ठित लोक कोर्टात वादी  किंवा प्रतिवादी म्हणून उभे राहण्यास संकोच करत. त्यामुळे त्यांची सारी भिस्त वकिलावर असे. केवळ  जामीन मिळवण्यासाठी देखील वकिलाला २,००० ते ४,००० रुपये त्या काळी सहज मिळत. त्यामुळे केशवरावांची मिळकत देखील बरीच वाढली.